मुंबई : प्रतिनिधी
स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग कान्होजी आंग्रे या विषयावरील चित्ररथ प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथील संचलनात सहभागी होणार आहे. कान्होजींच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा करणार्या या चित्ररथाची बांधणी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आहे.
ज्यांचे अश्वदल त्यांची पृथ्वी अन् ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी प्रथम आरमार उभारले. स्वराज्याच्या सीमा समुद्रापर्यंत पोहोचवल्या आणि नौसेनेचे महत्त्व अधोरेखित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदाच समुद्र सैनिकांची तुकडी निर्माण केली. गुराब, गलबते, तरांडे, तारु, शिबाड, मचवा, पगार, वाघोर अशा विविध समुद्र वाहनांची निर्मिती केली. छत्रपती संभाजी राजे यांनीही सिद्दी, डच, पोर्तुगीज यांना शह देण्यासाठी आरमाराचा विस्तार केला. छत्रपतींच्या या आरमार उभारणीत अनेक वीरांनी योगदान दिले त्यापैकी एक म्हणजे कान्होजी आंग्रे.
चित्ररथातून स्वराज्याची सेवा करताना कान्होजींच्या नेतृत्वाखाली सागरामध्ये स्वराज्याचे भगवे तोरण कसे दिमाखाने चढले, फडकू लागले, त्यांनी इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्यावर समुद्रावरून कसे नियंत्रण ठेवले याची शौर्यगाथा उलगडून सांगितली जाणार आहे.
सुरतपासून कोचीनपर्यंत पसरलेल्या अथांग दर्याचा सेनापती, मराठा साम्राज्याचा पहिला नौसेनापती म्हणून आग्रे यांनी धोरणीपणाने आणि मुत्सद्देगिरीने 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधी सागरी तटावर काम केले. कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, याठिकाणी सुधारित जहाज बांधणी, शस्त्रनिर्मितीची भरीव कामगिरी केली.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …