पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील भाजप तालुका मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या शनिवारी (दि. 25) जाहीर करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणूका झाल्या असून बुथ अध्यक्ष पासून ते राष्ट्रीय अध्यक्षांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. भाजपच्या संघटनात्मक द़ृष्टीने रायगड जिल्ह्याचे दोन जिल्हे करण्यात आले आहेत. त्यातील तालुका अध्यक्षांच्या निवडी यापूर्वी झाल्या असून त्यानंतर उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी अॅड. महेश मोहिते यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष निवडीपर्यंत ज्या तालुकाच्या अध्यक्षांची निवड झाली नाही त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा जिल्हाध्यक्षांना असतो. त्यानुसार संघटन मंत्री सतिष धोंड व कोकणचे नेते माजी पालकमंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांच्या सुचनेप्रमाणे उर्वरीत तालुका अध्यक्ष नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. उत्तर रायगड जिल्हयातील कर्जत तालुका मंडल अध्यक्ष म्हणून मंगेश म्हस्कर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. तसेच दक्षिण रायगडमधील पोलादपूर तालुका मंडल अध्यक्ष म्हणून प्रसन्ना पालंडे, अलिबाग तालुका मंडल अध्यक्ष म्हणून परशुराम म्हात्रे, मुरूड तालुका मंडल अध्यक्ष म्हणून महेंद्र चौलकर तर सुधागड तालुका मंडल अध्यक्ष म्हणून चंद्रकांत घोसाळकर यांच्या नियुक्तीची घोषणा जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी केली असल्याची माहिती जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी दिली.