Breaking News

दिवाळी अंकामुळे दिवाळी सण ज्ञानाचा उत्सव -डॉ. सदानंद मोरे

पनवेल ः रामप्रहर वृत्त
मराठी साहित्यात दिवाळी अंकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवाळी ही केवळ फराळ, फटाके व आनंदसोहळ्यापुरती मर्यादित नसून दिवाळी अंकांच्या माध्यमातून ज्ञान, विचार, साहित्य व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळी सण दिवाळी अंकाच्या अनुषंगाने ज्ञानाचासुद्धा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी गुरुवारी (दि. 25) येथे केले.
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 24व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात झाला. या वेळी दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटनही सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून मुख्य आयोजक आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, लेखक, साहित्यिक, साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदानंद मोरे यांनी पुढे बोलताना सांगितले की, शतकी परंपरा असलेल्या या दिवाळी अंक स्पर्धेला पुरस्कृत करून दिवाळी अंक परंपरेला सन्मान देण्याचे काम श्री. रामशेठ ठाकूर समाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाने केले आहे. या वेळी त्यांनी साहित्य आणि वाचन याबद्दल उदाहरण देत दिवाळी अंकाचे महत्त्व अधोरेखित केले. दिवाळी अंक लेखन आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करते. त्यामुळे दिवाळी अंक मराठी साहित्याचा अविभाज्य भाग असून लोकनेते रामशेठ ठाकूर हे लेखक साहित्यिक यांच्या पाठीशी आहेत आणि महाराष्ट्राला हेवा वाटेल असे त्यांचे कार्य आहे, असेही त्यांनी अधोरेखित करून कौतुक केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात म्हटले की, स्पर्धेला 24 वर्षे झाली आणि त्या अनुषंगाने ही दिवाळी अंक स्पर्धा रंगत गेली. त्यामुळे अंकांच्या संख्येत वाढ झाली. दिवाळी अंक मराठी भाषेचे वैभव आहे व ते वृद्धिंगत झाले पाहिजे म्हणून त्यासाठी भरघोस रकमेची पारितोषिक देऊन प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. डिजिटलच्या युगात वर्तमानपत्राचे महत्त्व आजही कायम आहे. 90 टक्के पत्रकार दिवाळी अंकांची निर्मिती करत असतात. लेखन व वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी ही दिवाळी अंक स्पर्धा असल्याचे त्यांनी नमूद करत दिवाळी अंकांची गोडी कधीही कमी होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आपल्या भाषणातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वसामान्य माणसासाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला. लोकनेते रामशेठ ठाकूर दरवर्षी चार लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे देऊन दिवाळी अंकांना प्रोत्साहन देत असल्याचे सांगून दिवाळी अंक स्पर्धेला बळ देण्याचे काम ते करत असल्याचे त्यांनी म्हटले. समाजाशी जोडलेली ही लोकं वाढदिवस स्वतःसाठी नाही, तर समाजाच्या हितासाठी समाजोपयोगी उपक्रमातून साजरे करतात. त्यांचे कार्य एवढे महान आहे की त्यांच्यावर कांदबरी निघेल. प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला लागले पाहिजे यासाठी लाखाचा मोर्चा काढणारेदेखील रामशेठ ठाकूर आहेत, असेही नमूद करत ’देता देता इतुके द्यावे की त्याने रामशेठ ठाकूर व्हावे.’ त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात एक तरी रामशेठ ठाकूर हवा आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी आपल्या भाषणात स्पर्धेविषयी माहिती विशद केली. ही स्पर्धा होण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे श्रेय असल्याचे नमूद करत त्यांचे आभार मानले तसेच आमदार प्रशांत ठाकूर राज्यातील सर्वात नम्र आमदार असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
स्पर्धेत एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असलेला प्रथम क्रमांक अर्थात सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय दिवाळी अंकाचा पुरस्कार ‘हंस’ या अंकाने पटकाविला तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक इंद्रधनु अंकाने पटकाविले. त्यांना 40 हजार रुपये आणि सन्मानचिन्हाने सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय पारितोषिक अंतरीचे प्रतिबिंब, तृतीय पारितोषिक अक्षर, तर सर्वोत्कृष्ट विशेषांक नवभारत, दृश्य कला विशेषांक; मुलांसाठी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक ’वयम’, उत्तेजनार्थ छावा, उत्कृष्ट दिवाळी अंक कालनिर्णय, सर्वोत्कृष्ट कथा सत्याग्रह, मिलिंद बोकील (दीपावली), उत्कृष्ट कविता आजकाल बायकाही…, लक्ष्मी यादव, पुरुष स्पंदन (76); लक्षवेधी परिसंवाद असहमतीचा आवाज, ऋतुरंग; लक्षवेधी मुलाखत डॉ. सुनील लवटे, शब्दशिवार, इंदूमती गोंधळे; सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ उत्तम अनुवाद, सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, शब्द रूची; सर्वोत्कृष्ट डिजिटल अंक विवेक मेहेत्रे, ’उद्वेली ऑल दि बेस्ट 2024’; विशेष लेख राजकारण की टोळीयुद्ध, आर्याबाग, विनय हर्डीकर यांनी, तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय पारितोषिक आगरी दर्पण, तृतीय पारितोषिक शब्दसंवाद, उत्तेजनार्थ लोकसेवक, साहित्य आभा, उत्कृष्ट कथा रेखा नाबर, लोकसेवक, जिथे कमी तिथे मी; उत्कृष्ट कविता हितवर्धक, कवी गणपत म्हात्रे, उत्कृष्ट व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे साहित्य आभा या अंकांनी पटकाविला. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून शुभेच्छा आणि कौतुक

या सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार होती, मात्र शासकीय कामामुळे त्यांना उपस्थित राहता आले नाही. असे असले तरी मंत्री आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याची खंत व्यक्त करत दिलगिरी व्यक्त केली. या सोहळ्याला येण्याची इच्छा असतानाही अचानक शासकीय कार्यक्रमामुळे येत नसल्याचे त्यांनी कळविले तसेच तशी विशेष चित्रफीत पाठवून संस्थेमार्फत क्रीडा, संस्कृती व कलाक्षेत्रास वाव देण्याकरिता समाजातील विविध घटकांसाठी आपली संस्था सतत प्रयत्नशील असल्याचे नमूद करत सोहळ्याला शुभेच्छा व्यक्त करून या स्पर्धेचे कौतुक केले.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सन 1995पासून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत उपक्रम अखंडपणे करत आहे. या उपक्रमांपैकीच लोकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हृदयाच्या जवळची अशी दिवाळी अंक स्पर्धा विशेष ठरली आहे. रायगड जिल्ह्यापासून सुरुवात झालेल्या या स्पर्धेने आज राज्यस्तरीय व्यासपीठ गाठले आहे. याला मुंबई मराठी पत्रकार संघाचे अनेक वर्षांपासून मिळत असलेले सहकार्य आणि साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे या स्पर्धेचे रूप अधिकच भव्य झाले आहे. आज ही स्पर्धा केवळ स्पर्धा राहिली नाही, तर ती सर्जनशीलतेचा उत्सव ठरली आहे. या प्रवासात साथ देणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
-आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ

Check Also

भाजपच्या दणक्याने रूबी मिल्स कंपनी व्यवस्थापन नरमले

15 दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र खोपोली, चौक : प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील …

Leave a Reply