Breaking News

निटको टाईल्स कंपनीला टाळे ; 300 कामगारांवर उपासमारीची वेळ

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील श्रीगाव येथील  निटको टाईल्स कंपनी प्रशासनाने कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता रातोरात टाळे ठोकले आहे. त्यामुळे या कंपनीत काम करणारे 300 कामगार बेरोजगार झाले आहेत. विशेष बाब म्हणजे जे पाच कामगार रात्रपाळीसाठी कामावर होते, त्यांनासुद्धा कंपनीला टाळे लावल्याची कल्पना नसून, ते कंपनीमध्येच आहेत. या प्रकरणी कामगार आता न्यायालयात दाद मागणार आहेत. कामगारांनी आज कंपनीच्या गेटसमोर धरणे  आंदोलन केले.

निटको कंपनीचे मालक विवेक तलवार यांनी 1995 साली अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे स्थानिकांची 86 एकर जागा खरेदी केली आहे. या जागेवर 1997 साली निटको कंपनीची बांधणी केली. स्थानिकासह कंपनीत 250 कायम कामगार तर 50 कंत्राटी कामगार काम करू लागले. सोमवारी (दि. 27)   कामगार कंपनीत येऊ लागले, तेव्हा कंपनी प्रशासनाने लॉक आऊटची नोटीस लावलेली पाहून सर्व कामगार अचंबित झाले. अलिबागमधील कंपनीला टाळे ठोकून कंपनीने येथील कामगारांना वार्‍यावर सोडले असताना, गुजरातमधील युनिट सुरू ठेवले आहे.

कंपनी बंद झाल्याची माहिती कळताच कामगारांनी कंपनी गेटवर येऊन धरणे धरले आहे. कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीच्या गेटला लॉक लावले आहे. कंपनी प्रशासनाच्या विरोधात कामगार न्यायालयात दाद मागणार असून हा लढा कायदेशीर लढणार असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

कामगार आयुक्तांकडे आठवड्यापुर्वी बैठक होऊन तोडगा काढण्याबाबत कंपनी प्रशासनाला सांगितले होते. मात्र कंपनी प्रशासनाने कामगारांना अंधारात ठेऊन कंपनीला टाळे ठोकले आहे. याबाबत आम्ही कायदेशीर लढाई देणार आहोत.

-दीपक रानवडे, कामगार नेते

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply