Breaking News

मुस्लिम बांधवांनी रमजानमध्ये नमाज, इफ्तार, तरावीह पठण घरातच करावे

जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

अलिबाग : प्रतिनिधी – पुढील आठवड्यात सुरू होणार्‍या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार आदी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारीसाठी एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना जिल्हा प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात सामाजिक विलगीकरणाच्या सूचनांचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्येही कटाक्षाने करावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत मशिदीत नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये. घराच्या, इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण तसेच इफ्तार करण्यात येऊ नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करू नये, लॉकडाऊनविषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply