अशोक चव्हाण यांचा इशारा
मुंबई ः प्रतिनिधी
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेसंबंधी गौप्यस्फोट करताना घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतल्याचे सांगितले, तसेच शिवसेनेने जर ठरलेल्या उद्देशिकेबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी या वेळी दिला. सोनिया गांधी यांचा तीन पक्षांच्या सरकारला विरोध होता, परंतु आम्ही त्यांना राजी केले, असेही या वेळी त्यांनी सांगितले. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे आघाडी सरकारमधील घटक पक्षांत एकच खळबळ उडाली आहे.
संविधानाच्या चौकटीतच सरकार चालले पाहिजे. संविधानाच्या चौकटीबाहेर जाता कामा नये आणि तसे झाले तर सरकारमधून बाहेर पडायचे, अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली होती. याबाबत संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाही. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीतच सरकार चालणार, अशी भूमिका घेतली. तसे त्यांनी लिहूनही दिल्यानेच सरकार स्थापन झाले, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी या वेळी दिली.
तीन पक्षांचे सरकार चालणार कसे, असा प्रश्न विचारला जात होता. दिल्लीत ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली असता त्यांनी नकार दिला. हे सरकार चालणार कसे, असा प्रश्न त्यांनी केला, असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.