Breaking News

शिक्षण, आरोग्य समितीवर घारेंची बोळवण

कर्जत : बातमीदार
रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बनलेले सुधाकर घारे यांना नाराजीनंतरही अर्थ आणि बांधकाम खाते न देता त्यांची शिक्षण आणि आरोग्य समितीवर बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे आता ते काय पवित्रा घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे विश्वासू समजले जाणारे सुधाकर घारे यांची अपेक्षेप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदावर 3 जानेवारी रोजी नियुक्ती झाली होती. त्यानंतर 15 जानेवारीला विषय समित्यांसाठी निवडणूक झाली. सर्वसाधारणपणे जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष हा अर्थ आणि बांधकाम समितीचा सभापती बनत असतो. मागील अडीच वर्षे रायगड जि.प.तील राष्ट्रवादी काँग्रेसचा सहकारी शेतकरी कामगार पक्षाकडे बांधकाम आणि अर्थ समिती होती. त्यामुळे या वेळी ती राष्ट्रवादीकडे जाणार हे निश्चित मानले जात होते, तसेच सुधाकर घारे हे उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याकडे बांधकाम आणि अर्थ समिती जाणार हेही जवळपास पक्के होते, मात्र जि. प.च्या माजी अध्यक्ष व शेकाप नेत्या नीलिमा पाटील यांना सभापती करीत त्यांच्याकडे बांधकाम आणि अर्थ या महत्त्वाच्या समितीचा पदभार देण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शेकापमध्ये धुसफूस सुरू झाली.
त्या वेळी घारे यांच्या समर्थकांनी जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ या मुख्यालयात उपाध्यक्ष आणि बांधकाम समिती सभापती यांचे दालन ताब्यात घेऊन तेथून घारे यांनी उपाध्यक्षपदाचा कारभार सुरू केला, पण आपल्याला दिलेल्या विषय समितीचा पदभार मात्र घेतला नव्हता.
कर्जत आणि खालापूर तालुक्याला एकमेव सभापतिपद सुधाकर घारे यांच्या रूपाने मिळाले असल्याने त्यांना चांगल्या विषय समित्या देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी माजी आमदार लाड यांचीदेखील होती, मात्र नीलिमा पाटील यांना देण्यात आलेली अर्थ आणि बांधकाम समिती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास शेकापवाले तयार नव्हते. हा वाद खासदार सुनील तटकरे यांच्याकडे गेला. तरीही मार्ग निघत नसल्याने घारे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता, तसेच दिल्या गेलेल्या विषय समित्यांचा पदभार स्वीकारला नव्हता. त्यामुळे घारे यांना कोणती विषय समिती मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
अखेर 27 जानेवारी रोजी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले सुधाकर घारे यांना शिक्षण आणि आरोग्य या दोन खात्यांच्या विषय समित्यांचे सभापती करण्यात आले आहे. दुसरीकडे जि. प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांना जलसंधारण समितीवर सदस्य करीत जि. प.चे स्वीकृत सदस्य करण्यात आले आहे. त्यामुळे घारे आता आपली ताठर भूमिका कायम ठेवणार की दिलेली खाती निमूटपणे स्वीकारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply