पनवेल : बातमीदार
भारतात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नायजेरियातून भारतात आणलेल्या एका 21 वर्षीय तरुणीला नायजेरियन दाम्पत्याने शरीरविक्रय व्यवसायात ढकलल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित नायजेरियन तरुणीने पाच महिन्यांनंतर स्वत:ची सुटका करून घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी नायजेरियन दाम्पत्यासह तिघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. यातील जन ओखाफर या नायजेरियन नागरिकाला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने
यापूर्वीच अटक केली आहे.
पीडिता मूळची नायजेरिया देशातील असून ती हेअरस्टायलिस्ट आहे. गेल्या वर्षी ती आपल्या देशात नोकरीच्या शोधात असताना जानेवारी-2019मध्ये किंगस्ली नावाच्या व्यक्तीने तिच्याशी मैत्री वाढविली. त्यानंतर त्याने त्याची बहीण ग्रेस ओखाफर भारतामध्ये असल्याचे सांगून ती भारतामध्ये तिला चांगली नोकरी मिळवून देईल, असे आमिष दाखवले. त्याने स्वत:चे पैसे खर्च करून तरुणीचा व्हिसा व पासपोर्ट बनवून जून महिन्यात तिला भारतात पाठवले.
तरुणी दिल्लीमध्ये विमानाने उतरल्यानंतर तिला एका अनोळखी महिलेने रेल्वेचे तिकीट काढून दिले. तरुणी रेल्वेने मुंबईत सीएसएमटी स्थानकात दाखल झाली.
सीएसएमटी रेल्वे स्थानकात ग्रेस व तिचा पती जन ओखाफर हे दोघे भेटल्यानंतर त्यांनी तरुणीला टॅक्सीने डोंबिवली येथील लोढा पलावा येथील फ्लॅटमध्ये नेऊन ठेवले. त्यानंतर तिला धमकावून शरीरविक्रय व्यवसाय करण्यास भाग पाडले. हा व्यवसाय न केल्यास ठार मारून नदीत फेकून देण्याची धमकी दिली. अंधश्रद्धेबाबत भीती दाखवून त्यासंदर्भातील व्हिडीओ दाखविले. त्यानंतर त्या दोघांनी तरुणीला एका ग्राहकासोबत सात दिवस खारघरमध्ये पाठविले. त्याबदल्यात मिळालेले 13 हजार 500 रुपये पीडित तरुणीने ग्रेसला दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.