न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्या सामन्यात मालिकाही खिशात
हॅमिल्टन : वृत्तसंस्था
रोहित शर्माच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेतील तिसरा थरारक विजय नोंदवत मालिकाही खिशात घातला. हिटमॅन रोहितने पाठोपाठ दोन षटकार मारून सामना गाजवला. तत्पूर्वी मोक्याच्या क्षणी मोहम्मद शमीने पहिल्या चेंडूवर षटकार जाऊनही नेटकी गोलंदाजी केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
भारताने दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडनेही निर्धारित 20 षटकांत 179 धावाच केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने 95 धावांची दमदार खेळी करत विजय आवाक्यात आणला होता, मात्र निर्णायक क्षणी मोहम्मद शमीने विल्यम्सन आणि रॉस टेलर या अनुभवी खेळाडूंना बाद करीत सामन्यात रंगत निर्माण केली. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले. युजवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांनी एक एक गडी बाद केला.
त्यापूर्वी रोहित शर्माचे अर्धशतक (65) आणि कर्णधार विराट कोहली (38) यांच्या खेळीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत पाच बाद 179 धावांपर्यंत मजल मारली होती. रोहित व के. एल. राहुलची जोडी फुटल्यानंतर ठरावीक अंतराने विकेट्स पडल्या. शिवम दुबेला कर्णधाराने तिसर्या स्थानी पाठवले, मात्र त्याला फायदा घेता आला नाही. विराट बाद झाल्यानंतर मनीष पांडे व रवींद्र जडेजाने अखेरच्या षटकांत धावगती वाढवली.