Breaking News

विराट कोहलीची डीआरएसवर पुन्हा नाराजी

मोहाली : वृत्तसंस्था

मोहालीतील चौथ्या वनडेत अखेरच्या षटकांमध्ये तडाखेबंद फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणार्‍या अ‍ॅश्टन टर्नरविरोधातील डीआरएस (डिस्प्ले रिव्ह्यू सिस्टिम) अपीलनंतर दिलेल्या निर्णयावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डीआरएसच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येतो, असे त्याने म्हटले.

भारताने 358 धावांचा डोंगर उभा केला, पण ऑस्ट्रेलियाने चार गडी राखून धावांचा डोंगर पार करत विजय मिळवला. विजयाचा शिल्पकार ठरलेला अ‍ॅश्टन टर्नरविरोधातील डीआरएस अपीलनंतर दिलेल्या निर्णयावर विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली. टर्नरने 43 चेंडूंमध्ये 84 धावा काढून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या डावाचे 44वे षटक चहलने टाकले. चहलने टाकलेला चेंडू टप्पा घेऊन बाहेरच्या दिशेने जात यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या हातात विसावला. त्यानंतर त्याने टर्नरला यष्टिचित करण्याचा प्रयत्न केला आणि जोरदार अपील केले; तर स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या पंचांनी तिसर्‍या पंचांकडे इशारा केला. टर्नरचा पाय क्रीजमध्ये असल्याचे रिव्ह्यूमध्ये स्पष्ट दिसले. त्यामुळे यष्टिचित होण्याचा प्रश्नच नव्हता, पण झेलबाबत म्हणाल तर कसलातरी आवाज झाल्याचे वाटत होते. चेंडू बॅटच्या पुढे गेल्यानंतर स्पाइक येत असल्याचे स्क्रीनवर दिसले, मात्र पंचांनी वाइड चेंडू दिला. या निर्णयावर विराटने तीव्र नाराजी व्यक्त केली. डीआरएस निर्णय आम्हा सर्वांसाठी धक्का देणारा ठरला. जवळपास प्रत्येक सामन्यानंतर यावर चर्चा होऊ लागली आहे. डीआरएसच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसू लागला आहे. तो क्षण सामन्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा होता, अशी प्रतिक्रिया विराटने सामना संपल्यानंतर दिली.

याआधी रांचीत झालेल्या सामन्यात डीआरएसची चूक दिसून आली होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच बाद झाल्यानंतर बॉल-ट्रॅकिंगचा वाद झाला होता. कुलदीप यादवने टाकलेला चेंडू लेग स्टम्पच्या रेषेवर जात होता. बॉल ट्रॅकिंगमध्ये मात्र चेंडू मिडल आणि लेग स्टम्पवर आहे असे दिसत होते. फिंच दोन्ही बाजूंचा विचार केला तरी बाद होता. या चुकीकडे माजी क्रिकेटपटूंचेही लक्ष वेधले. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज शेन वॉर्न आणि दिग्गज फलंदाज मार्क वॉ यानेदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

Check Also

निवडणुकीची हवा वाढतेय

राजकीय ’पिक्चर’ पाहूद्या की… प्रत्येक दिवसासोबत लोकसभा निवडणूक अधिकाधिक जवळ येत चाललीय, नवा रंग, रूप …

Leave a Reply