पनवेल ः रामप्रहर वृत्त
सालाबादप्रमाणे श्रावण महिन्यात सिडको एम्प्लॉईज युनियनच्या वतीने अध्यक्ष विनोद पाटील यांच्या संकल्पनेतून ट्रेकसाठी इच्छुक असणार्यांसाठी श्री भीमाशंकर येथे ट्रेकिंगचे आयोजन केले जाते. एकूण 45 कर्मचार्यांनी भीमाशंकर ट्रेकला जाण्यासाठी आपली नावे नोंदवली होती. 21 ऑगस्ट रोजी ट्रेकर्ससाठी सिडकोचे नाव व सिडकोचा लोगो असलेले, तसेच यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाचे चिन्ह ही टी-शर्ट वर छापल्याने, टी-शर्ट परिधान केलेले 45 सिडकोचे कर्मचारी एक वेगळ्याच उत्साहात होते.
सिडको भवन येथे सकाळी आठ वाजता बस येऊन सज्ज झाली. प्रवास सुरू झाला, रिमझिम पावसाने प्रवाशांचे स्वागत केले. बसमध्ये सर्वांना न्याहारीचे वाटप झाले. कर्जत मार्गाने बसने खांडसचा पायथा गाठला. सर्वांनी डोंगर चढण्यास सुरुवात केल्यानंतर अंदाजे अर्ध्या तासानंतर गणेश मंदिर लागले. सर्व जण पोहचल्यावर सर्वांनी घंटानाद करीत श्री गणेशाची महाआरती केली. निर्जनस्थळी, निसर्गरम्य वातावरणात मंदिरातील घंटानाद व आरतीच्या आवाजाने, त्याला साथ देत रिमझिम बरसणार्या पावसाने,मंजुळ हवा यामुळे, एक वेगळेच वातावरण तयार झाले.
उत्साही मंडळी दम लागत असूनसुद्धा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत सर सर डोंगर चढत होते. प्रवासातील एका टप्प्यावर सर्वजण हवालदिल झाले. डोंगराच्या एका वळणावर पुढे जाण्यासाठी, धुक्यामुळे पुढचा टप्पा दिसत नव्हता. त्या पाऊलवाटेवर झर्याचे सतत पाणी वाहत होते,त्यामुळे पाय ठेवण्याच्या इतपत भाग सोडला तर सगळीकडे ओलसर खडकच होता. आधार घेण्यासाठी, आधार घेऊन तो टप्पा ओलांडण्यासारखे ही काही दिसत नव्हते. पाय सावधपणे ठेवून, स्वतःचा तोल स्वतः सांभाळत पुढे सरकणे हा एकमेव पर्याय आमच्या सर्वांच्या समोर होता कारण दुसर्या बाजूला खोल दरी होती. सुदैवाने आम्ही सर्वांनी काहींनी घाबरत तर काहींनी साहस दाखवत तो टप्पा पार केला. त्यानंतर जवळपास एक दीड तासाच्या अवघड चढाई करत डोंगराळ क्षेत्रातून, प्रवास करीत भीमाशंकर तीर्थक्षेत्राच्या मागच्या बाजूस आम्ही अंदाजे साडे चार तासाच्या एकूण प्रवसानंतर आम्ही काही जण पोहोचले.
अगोदरच आमच्या पुढे निघालेली दुसर्या ग्रुपमधील मंडळी पोहोचली होती. त्यांच्या भारत माता की जय,जय भवानी -जय शिवाजी, बम बम भोले, हर-हर महादेव या घोषणांनी सभोवतालची डोंगर, कडेकपारी दुमदुमली होती. काहींनी तिरंगी हातात उंचावून तर काहींनी भगवे झेंडे हातात घेऊन घोषणा देत होते, फोटो काढत होते. हे सर्व वातावरण पाहून आमचा सगळा थकवा गायब झाला,आम्ही सर्वजण त्या उत्साहवर्धक, जोशपूर्ण वातावरणात त्यांच्यात समरस झालो. श्री भीमाशंकर मंदिराचे कलश दर्शन घेऊन मग बसस्थानकावर पोहचले.
श्री भीमाशंकर क्षेत्र हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. श्रावणी सोमवार असल्याने काही जणांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ज्यांना खरोखर निसर्ग, डोंगर, झरे,धबधबे, हिरवी गर्द झाडी, दगड धोंड्यात, पक्ष्यांच्या किलबिलाटाच्या सहवासात रहायला- रमायला आवडतं, त्यांनी श्री भीमाशंकर येथे ट्रेक करून या डोंगराला भेट अवश्य द्यावी, असे सिडको ट्रेक ग्रुपचे नितीन सोमनाथ कांबळे यांनी सांगितले.