Sunday , September 24 2023

पारदर्शकतेचा उत्सव

यंदाच्या निवडणुकीत भारतीय लोकशाही स्वतःचेच काही विक्रम मोडीत काढणार आहे. तब्बल 90 कोटी नोंदणीकृत मतदार या वेळी आपला मतदानाचा अधिकार बजावतील. ही आजवरची सर्वोच्च मतदारसंख्या आहे. इतकेच नव्हे, तर अमेरिका आणि युरोपातील जनसंख्येपेक्षाही हा आकडा मोठा आहे. यापैकी सुमारे साडेआठ कोटी मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत.

संपूर्ण देशाला ज्याची गेले काही महिने प्रतीक्षा होती, त्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा रविवारी जाहीर झाल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लोकशाहीचा उत्सव सुरू झाला’ अशी प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केली. निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणारे विविध पक्ष आणि उमेदवार यापूर्वीच तयारीला लागलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या या घोषणेबरोबरच देशभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून त्यामुळे आता देशातील कुठल्याही राज्यातील, तसेच केंद्रातीलही सरकार यापुढे धोरणात्मक निर्णय जाहीर करू शकणार नाही. त्यामुळेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 हून अधिक महाप्रकल्पांचे शुभारंभ करून विकासाचा गाडा अव्याहत व वेगाने पुढे धावत राहील याची दक्षता घेतली आहे. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखालील सरकारने देशाच्या विकासयात्रेत सिंहाचा वाटा उचलला आहे. आपल्या भरीव कामगिरीच्या बळावरच भारतीय जनता पक्ष पुन्हा एकवार जनतेची साथ मागतो आहे. येत्या 11 एप्रिलपासून सुरू होणारा मतदानाचा यज्ञ तब्बल दीड महिना सुरू राहील व त्याची सांगता 23 मे रोजी होईल. यंदा होणारी सार्वत्रिक निवडणूक ही सर्वार्थाने ऐतिहासिक, विक्रमी आणि वैशिष्ट्यपूर्ण मानावी लागेल. गेल्या 14 फेब्रुवारी रोजी काश्मिरातील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या भीषण हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 12 दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे धडाडीने उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांचे आणि पाकिस्तानचेही कंबरडे मोडले. या घटनांपाठोपाठ राष्ट्रप्रेमाने भारलेल्या देशभरात मोदी हेच भारताला समर्थ नेतृत्व देऊ शकतात अशी भावना तयार झाली आहे. या घटकेला देशाचे संरक्षण आणि विकास या दोन्ही आघाड्यांवर भारताला कणखरपणे नेतृत्व देऊ शकणारा नेता निर्विवादपणे नरेंद्र मोदी हेच आहेत. अर्थातच, विरोधकांना हे विधान फारसे रुचणार नाही, परंतु अंतर्मुख होऊन विचार केल्यास हे सत्य नाकारणे त्यांनाही कठीणच जाईल, परंतु अशा उमदेपणाची अपेक्षा विरोधकांकडून करण्यासारखी परिस्थिती तूर्तास दिसत नाही. जनतेचा कौल मात्र स्पष्टपणे मोदींच्या बाजूने दिसतो आहे. राष्ट्रप्रेमाची प्रखर झालर असलेली ही निवडणूक म्हणूनच ऐतिहासिक ठरेल. यंदा 10 लाख मतदान केंद्र असतील व अत्यंत व्यापक स्तरावर व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर केला जाईल. त्यामुळे आपले मत नेमके कुणाला गेले याचा पुरावाही मतदारांना मिळू शकणार आहे. साहजिकच आजवरची सर्वात पारदर्शक निवडणूक असेच या निवडणुकीचे वर्णन करावे लागेल. विरोधकांना मात्र त्यामुळे निकालानंतर पराभवाचे खापर फोडण्यासाठी नवी सबब शोधावी लागेल. एकमेकांच्या शिरावर खापर फोडून विरोधकांचे तथाकथित महागठबंधन आपले मनोरंजन करीलच. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात नवमतदारांना भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ही निवडणूक उद्याच्या भारताचे भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे त्यांचा व एकूणच जनतेचा कौल निश्चितच एनडीएला लाभेल.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply