Tuesday , February 7 2023

माथेरान एमटीडीसीमध्ये पारंपरिक जेवणाची लज्जत

माथेरान हे ब्रिटिशांनी शोधून काढलेले माथ्यावरील रान म्हणजे माथेरान हे आज वाहनांना बंदी असलेले जगातील एकमेव असे पर्यटनस्थळ आहे. या थंड हवेच्या ठिकाणी पावसाळ्यात धुक्याची दुलई अनुभवण्यासाठी पर्यटक चारही महिने गर्दी करतात, तर हिवाळ्यात येथील गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. दुसरीकडे उन्हाळा सुरू झाला की सर्वांना थंड हवेच्या ठिकाणाची आठवण होते आणि आपोआप माथेरान हे मुंबईपासून सर्वांत जवळ असलेल्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी पावले वळतात. त्यात गर्द हिरवाई आणि झुकझुक आगीनगाडी अशी दुहेरी मजा माथेरान या पर्यटनस्थळावर अनुभवास मिळत असल्याने पर्यटक वर्षभर या ठिकाणी येत असतात. पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन आणि येथील वातावरण हे वर्षभर सर्वांना आवडणारे आहे हे ध्यानात घेऊन राज्य पर्यटन विकास महामंडळ यांनी पर्यटन निवास केंद्र उभारले आहे.

पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या गिरीशिखरावरील माथेरानमध्ये सुविधा देण्यावर राज्यातील प्रत्येक विभागातून हालचाली सुरू आहेत. एमटीडीसी शाखाही त्याला अपवाद नाही. येथील रिसॉर्टमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सुविधा देऊ केल्यात. त्यापैकी पारंपरिक मातीच्या भांड्यांमध्ये चुलीवरचे जेवण दिले जाणार आहे. त्यातून पर्यटन क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्याचे काम माथेरानमधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टने कात टाकून केले आहे. 2300 फूट उंचीवरील माथेरान या पर्यटन स्थळावर जाण्यासाठी जे दोन मार्ग आहेत, त्या दोन्ही मार्गांवर हे पर्यटन निवास केंद्र उभे आहे. एकमेव अशा रस्तेमार्गाने नेरळ येथून वाहन तळ येथे पोहचल्यास माथेरानच्या दस्तुरी नाका येथे असलेल्या पर्यटन निवास केंद्रावर आपण पोहचतो. या पर्यटन निवास केंद्राच्या पाठीमागे शासनाची गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था आहे, तर नेरळ-माथेरान-नेरळ या मिनीट्रेनचे रेल्वेस्थानक पर्यटन निवास केंद्र लक्षात घेऊन अमन लॉज हे रेल्वेस्थानक बनवण्यात आले आहे. त्यामुळे माथेरानला येत असलेल्या दोन्ही मार्गांवर असलेले हे पर्यटन निवास केंद्र पर्यटकांसाठी सोयीचे असेच आहे. येथील खोल्यांना टापटीप ठेवून सर्व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पर्यटकांना सेल्फी स्पॉट, छोटा ऑडोटोरिअम, आलेल्या पर्यटकांना वेगवेगळे खेळ आणि काही पर्यटकांना निरव शांतता झोन तयार करण्यात आला आहे. माथेरानमधील पर्यटन निवास केंद्रातील खोल्या या माथेरानमधील जंगलांची रंगसंगती असलेली हिरवाई यांच्या पध्दतीने बनवण्यात आल्या आहेत. त्यात अंतर्गत सजावट असो की बाहेरची पर्यटन निवास केंद्रातील त्या ठिकाणी स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे माथेरान पर्यटन केंद्र हे इंटरनेटवर सर्च केल्यावर तेथील परिसर पाहिला की प्रसन्न वाटते.

माथेरानच्या प्रवेशद्वारात आलेल्या पर्यटकांस सुरुवातीलाच एमटीडीसीच्या रिसॉर्टचे दर्शन घडते. हेरिटेज दर्जा मिळाल्याने याची वास्तू पर्यटकांना अतिशय विलोभनीय दिसते. खोल्यांमध्ये लाकडापासून बनविलेली फर्निचर, खोल्यांची आरास पर्यटकांना हमखास आवडते. यामुळे पर्यटक आवर्जून या रिसॉर्टमध्ये राहतात, पण आता रिसॉर्टने पर्यटकांना आवडणार्‍या खाद्यान्नाची व्यवस्था केली आहे. आता मागील काही वर्षांपासून स्मोकी भोजन खाण्याची प्रथा रूढ होत आहे.त्यात आपल्याकडेदेखील चुलीवर शिजवलेले जेवण असावे यासाठी या पर्यटन केंद्रावर चुलीवरच्या जेवणाची लज्जत चाखायला मिळणार आहे. हे चुलीवरचे जेवण पर्यटकांना केवळ भोजन म्हणून नाही, तर त्यांच्या मागणीनुसार नाश्ता म्हणूनदेखील चाखायची संधी त्यांच्या आवडत्या पदार्थांची ऑर्डर केल्यास मिळू शकते.

आता पर्यटन निवास केंद्रांवर महाराष्ट्र फूडबरोबर पंजाबी, गुजराती, मोघलाई, राजस्थानी जेवणाबरोबरच परदेशी फूडसुद्धा मिळणार आहे. खासकरून इटालियन फूडला पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. आता तर महाराष्ट्रीयन पद्धतीचे मातीच्या भांड्यात चुलीवरचे जेवण देण्याचा उपक्रम सुरू केल्याने येथील पर्यटन व्यवसायात वृद्धी होणार आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी कारभार हातात घेतल्यापासून महाराष्ट्रातील राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या रिसॉर्टमध्ये कमालीचे बदल केले आहेत. पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टमधील रूमचा टापटीपपणा तसेच पर्यटकांना हव्या असलेल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या आवडीच्या जेवणावर विशेष भर दिला गेला आहे. त्यात स्थानिक पातळीवर असलेल्या विशेष भोजनाची व्यवस्थादेखील प्राधान्याने करण्यात येत आहे, तसेच स्थानिक पातळीवरील प्रेक्षणीय स्थळांची  इत्थंभूत माहिती देण्यासाठी मोठ्या संख्येने गाईडची भरती करून त्यांना पर्यटकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. माथेरानमध्ये आहे त्याहून अधिक सुविधा दस्तुरी नाका येथील पर्यटन निवास केंद्र या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे माथेरानच्या पर्यटन निवास केंद्राकडे पर्यटक मोठ्या संख्येने आकृष्ट होतील, असा विश्वास माथेरानच्या विश्रामगृहाचे व्यवस्थापक अमोल भारती यांना वाटत आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply