मोहोपाडा : प्रतिनिधी
वाढदिवस सोहळा आणि त्यासाठी केला जाणारा खर्च न करता रसायनीतील तरुणांनी शिवस्मारकांचे सुशोभीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे रसायनी परिसरातील शिवस्मारकाच्या आवारात स्वच्छता असून शिवस्मारकाचे आकर्षण होत आहे.
रसायनी येथील एचओसी कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे नूतनीकरण व महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम युवा पिढीने हाती घेत आपल्या जिद्दीने व हिरहिरीने पूर्ण केले आहे. याच प्रेरणेतून पुन्हा मनोबल उंचावून मोहोपाडा बाजारपेठेतील शिवस्मारक आणि सभोवतालचा परिसर साफ सफाई करून रंगरंगोटी करण्यात आली. त्यासाठी आपल्या रसायानीमधील युवा पिढी अजित पाटील, केदार शिंदे, पंकज जाधव, चैतन्य खाने, मनीष पाटील, धीरज सोगे, ऋतिक पाटील, अमोल सुर्वे, प्रथमेश गायकवाड, नरेश अनंता रसाळ या युवकांनी पुन्हा एकदा शिवभक्त असल्याचा अभिमान बाळगला. मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील शिवस्मारकाच्या आवारातील परीसर व शिवरायांचे स्मारक पाण्याने स्वच्छ धुवून यानंतर रंगकाम करुन शिवस्मारकाची स्वच्छता केली. या तरुणांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे परिसरात बोलले जात आहे.