Breaking News

‘लोकशाही, निवडणूक आणि सुशासन’

पनवेल महानगरपालिका निवडणूक विभागातर्फे लोकशाही पंधरवडा स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल महानगरपालिका निवडणूक विभागातर्फे लोकशाही पंधरवडा दिनांक 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. यात ‘लोकशाही, निवडणूक आणि सुशासन’ या विषयाच्या अनुषंगाने महापालिका परिसरात मतदार जनजागृती करण्यासाठी सामाजिक संदेश देणार्‍या स्पर्धांचे आयोजन करून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

पनवेल महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय कॉलेज विद्यार्थ्यांतर्फे पथनाट्य स्पर्धांचे आयोजन केले आहे. हौशी कलाकारांना वाव देण्यासाठी ‘लोकशाही, निवडणूक आणि सुशासन’ या विषयावर जिंगल्स बनविण्याची स्पर्धा, मतदार नोंदणी व जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या प्रभागनिहाय को. ऑप. हौसिंग सोसायटीच्या अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व दोन सक्रिय सभादांना बैठकीस बोलावून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिकेतील सर्व सक्रिय स्वयंसेवी संस्था व सेवाभावी संस्थांना निमंत्रित करून लोकशाही, निवडणूक आणि सुशासन विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील व्यापारी आणि उद्योगपती यांचे चर्चासत्र व परिचय मेळावा आयोजन करून यशस्वी उद्योजकांना पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार  असल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

वरील स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल तसेच सर्व स्पर्धांत सहभाग घेणार्‍यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. लोकशाही पंधरवडा अंतर्गत मतदार जनजागृती व लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा, कॉलेजमध्ये लोकशाही, निवडणूक आणि सुशासन या विषयावर रांगोळी, वक्तृत्व, निबंध स्पर्धा व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येत आहे, तसेच निवडक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गट तयार करून पनवेल महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाला भेट घेऊन महापालिकेच्या कामकाजाबद्दल माहिती करून देण्यात येणार आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply