महाड : प्रतिनिधी
वेदा जनजागृती मंच आयोजित मिस, मिसेस रायगड आणि मिस, मिसेस महाड क्विन स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. महाडच्या इतिहासात प्रथमच झालेल्या स्पर्धेत महाडकर, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक महिलांनीही रॅमवॉक अनुभवला. मिसेस इंडिया राखी सोनार यांची उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
वेदा जनजागृती मंचच्या वतीने महिलांतील सुप्तगुणांना वाव मिळावा तसेच ग्रामीण भागातील महिलांना ग्लॅमरस व्यासपीठ उपलब्ध व्हावे, साधा पोशाख आणि राहणीमान असलेल्या महिलाही अशा स्पर्धा जिंकू शकतात हे जगाला दाखविण्याचा संस्थेचा प्रयत्न होता. रायगड जिल्हा मिस-मिसेससाठी काही महिन्यांपूर्वी निवड चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीतून मिस फायनलसाठी 24, तर मिसेस फायनलसाठी 17 महिला स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. मिस व मिसेस रायगड तसेच मिस व मिसेस महाडची फायनल रविवारी (दि. 2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक नाट्यगृह महाड येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
या वेळी पारंपरिक पोषाख, गुणात्मक सादरीकरण, पाश्चात्य पोषाख तसेच टॅलेंट अशा राऊंडमध्ये सदर स्पर्धा घेण्यात आली. यातून मिस रायगड किताब खुशी भोईर, मिस महाड श्रृती जंझाड, तसेच मिसेस रायगड किताब पूनम जाधव व मिसेस महाड किताब विद्या देसाई यांनी पटकावले तसेच मिसमध्ये सहा सबटायटल्स व मिसेसमध्येही सहा सबटायटल्स देण्यात आले. कार्यक्रमासाठी दि. अण्णासाहेब सावंत को. ऑ. बँकेच्या चेअरमन शोभाताई सावंत, मराठी कलाकार मानसी मराठे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. वेदा जनजागृती संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर गीते, डॉ. मंजुषा कुद्रीमूर्ती, डॉ. अंजली कर्णिक, मिसेस मीनल बुटाला, मिसेस मीनल शेठ यांनी विशेष योगदान दिले. राखी सोनार यांनी निवड पंचाचे काम केले. सूत्रसंचालन अॅड. सुविधा राजवाडकर यांनी केले. कार्यक्रमासाठी ग्रुमींग व कोरिओग्राफी सुयोग शिंदे व जय आंबावले तसेच नवनीत राजूरकर, अरबाज शेख, शहबाज शेख तसेच रिगल कॉलेज व हिरवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी मदत केली.