निव्वळ मोदीविरोध आणि गृहमंत्री अमित शहा यांचा द्वेष या दोन कलमी कार्यक्रमावर काँग्रेस व डाव्या पक्षांचा विरोध आखलेला असतो हे एव्हाना स्पष्टपणे दिसून आले आहे. मोदी-शहा यांचा विरोध करता करता आपण शत्रूराष्ट्राच्या शेजारी जाऊन उभे राहिलो आहोत आणि त्यांचीच भाषा बोलू लागलो आहोत याचे भान काँग्रेस नेत्यांना उरले नाही. त्याचेच प्रतिबिंब संसदेतील विरोधकांच्या विविध भाषणांमध्ये उमटले, पण सक्षम मोदींनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत काँग्रेससहित सर्व विरोधी पक्षांना जो वास्तवदर्शी आरसा दाखवला तो अगदी साक्षात्कारी म्हणावा लागेल. आपल्या शंभर मिनिटांच्या भाषणात विरोधकांच्या आक्षेपांना खोडून काढताना पंतप्रधान मोदी यांनी असंख्य उदाहरणे देत विरोधकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. अर्थात या नेत्रांजनामुळे काँग्रेस पक्षाचे डोके ठिकाणावर येईल अशी अपेक्षा मुळीच नाही, परंतु मतांचे ध्रुवीकरण नेमके कोण करत आहे याचे उत्तर भारताच्या जनतेला निश्चितच मिळाले असेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत साधक-बाधक चर्चा होणे अपेक्षित असते. हे अभिभाषण सत्तेत असलेल्या पक्ष वा आघाडीच्या सरकारनेच आखलेल्या धोरणांबरहुकुम असते. त्यामुळे साहजिकच अभिभाषणाबद्दल विरोधाचा सूर उमटणे हे लोकशाही तत्त्वाला अनुसरूनच आहे. तसा तो उमटलादेखील, परंतु काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी मोदी सरकारविरोधात उघडलेल्या आघाडीने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काँग्रेसचा मोदीविरोध संसदेपुरता मर्यादित न राहता रस्त्यांवर उतरला. त्याचे समाजात दुफळी माजवणारे चित्र आपण गेले काही दिवस पाहतोच आहोत. या सार्याचा खरपूस समाचार पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात घेतला. ‘सौ सुनार की और एक लोहार की’ असे त्यांच्या भाषणाचे वर्णन करावे लागेल. आपल्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यावर टीका झाल्यास काँग्रेसची पुढारी मंडळी तत्काळ हमरीतुमरीवर येतात किंवा त्यावरून केवढा गहजब होतो, पण काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्ली येथील एका भाषणात मोदीजींना दंडे मारले पाहिजेत असे उर्मट आणि बेमुर्वत विधान केले. त्यालाही पंतप्रधान मोदी यांनी खेळकरपणानेच उत्तर दिले. मला दंडे मारण्याआधी पूर्वसूचना दिलीत त्याबद्दल आभार. सूर्यनमस्कारांची संख्या वाढवून मी माझे शरीर कणखर करून ठेवेन. असल्या शिव्याशापांची मला गेली 20 वर्षे सवयच आहे, असा झणझणीत टोमणा त्यांनी राहुल गांधी यांना मारला. काँग्रेसकडे याचे अर्थातच काहीही उत्तर नव्हते. मोदी विरोधावर आधारलेले काँग्रेसचे संपूर्ण राजकारणच भरकटलेले असून त्याने देशाचेच नुकसान होईल, असा गंभीर इशारा मोदी यांनी या वेळी दिला. केवळ विरोधासाठी विरोध न करता सकारात्मक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन देशाचा विकास साधूया असे पंतप्रधानांनी केलेले आवाहन हवेत विरून जाण्याची शक्यताच अधिक आहे; कारण गेली असंख्य वर्षे काँग्रेसने देशभर चालवलेले मतांचे राजकारण, सत्तेसाठी रचलेले कुटील डावपेच आणि एकंदरीतच समाजाची चालवलेली दिशाभूल हे सारे इतक्या खालच्या पातळीवर पोहोचले आहे की पंतप्रधानांच्या शंभर मिनिटांच्या व्याख्यानामुळे त्यात काही बदल होईल असे नाही. लोकसभेमध्ये पंतप्रधानांनी दाखवलेल्या वास्तवदर्शी आरशात आपली बिघडलेली प्रतिमा ठळकपणे दिसते आहे, हे मनोमन मान्य करून काँग्रेसने मोदीविरोधाचा नाद सोडावा हेच इष्ट!