अलिबागमधील प्रकार
अलिबाग : प्रतिनिधी
बांधकाम व्यावसायिकाकडून 21 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अलिबाग येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयातील सहाय्यक प्रशांत मांडलेकर याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. 6) रंगेहाथ पकडले.
प्रशांत मंडलेकर याचाविरुद्ध एका बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाच्या रायगडच्या पथकाने गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसर्या मजल्यावर असलेल्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयातील सहाय्यक प्रशांत मांडलेकर याने मागणी केलेल्या लाचेच्या तक्रारीची पडताळणी केली. या पडताळणीत तथ्य आढळल्यानंतर 4च्या सुमारास पथकाने मांडलेकर यास 21 हजारांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळकृष्ण पाटील, विश्वास गंभीर, कौस्तुभ मगर, जितेंद्र पाटील, सुरज पाटील, स्वप्नाली पाटील, निशांत माळी, महेश पाटील यांनी ही कारवाई केली.