मुंबई : प्रतिनिधी
स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी संघ अशी ओळख असलेल्या मुंबईचे रणजी क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेले आहे. सौराष्ट्राविरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे मुंबईचा संघ बाद फेरीच्या शर्यतीमधून बाहेर फेकला गेला आहे. यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाला बडोद्याविरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.
पहिल्या डावात मुंबईने सर्फराज खान आणि शम्स मुलानीच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर 262 धावांचा पल्ला गाठला. सर्फराजने 78, तर मुलानीने 60 धावांची खेळी केली. त्यांना सलामीवीर जय बिस्तानेही 43 धावा करत चांगली साथ दिली. दुर्दैवाने पहिल्या डावात मुंबईचे नावाजलेले फलंदाज आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करू शकले नाहीत. सौराष्ट्राकडून पहिल्या डावात धर्मेंद्रसिंह जाडेजाने निम्मा संघ गारद केलात्याला प्रेरक मंकड आणि कुशांग पटेलने प्रत्येकी दोन, तर कमलेश मकवानाने एक बळी घेत चांगली साथ दिली.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या सौराष्ट्राच्या फलंदाजांनी चांगला खेळ केला. मधल्या फळीत शेल्डन जॅक्सनच्या 85 धावा आणि मधल्या फळीत त्याला चिराग जानीने नाबाद 84 धावांची खेळी करीत दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर सौराष्ट्राने मुंबईचे आव्हान पार केले. 335 धावांत सौराष्ट्राचा पहिला डाव आटोपला, मात्र 73 धावांची निर्णयाक आघाडी घेण्यात सौराष्ट्र यशस्वी ठरले. पहिल्या डावात मुंबईकडून रोस्टन डायसने चार, तर शम्स मुलानी आणि शशांक अत्राडेने प्रत्येकी दोन बळी घेतले. दुसर्या डावात मुंबईच्या फलंदाजांनी आपल्या खडुस आर्मी या नावाला साजेसा खेळ केला. कर्णधार सूर्यकुमार यादवचे शतक (134 धावा) आणि त्याला शम्स मुलानीने 92 धावा करीत दिलेली उत्तम साथ या जोरावर मुंबईने तिसर्या दिवसाच्या अखेरीस 362/7 या धावसंख्येवर आपला डाव घोषित करत सौराष्ट्राला विजयासाठी 290 धावांचे आव्हान दिले. दुसर्या डावात सौराष्ट्राच्या गडाला खिंडार पाडण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यशही आले. अखेरच्या दिवशी पहिल्या दोन सत्रांच्या खेळात मुंबईने 83 धावांत सौराष्ट्राचे सात गडी माघारी धाडले. चहापानानंतरच्या सत्रात मुंबईला विजयासाठी केवळ तीन बळींची गरज होती, मात्र कमलेश मकवाना आणि धर्मेंद्रसिंह जडेजा या जोडीने संपूर्ण सत्र खेळून काढत मुंबईची निर्णयाक विजयाची संधी हुकवली.