पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त
आपल्या देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी तरुण मतदारांनी पुढे यावे, असे आवाहन पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी केले.
पनवेल महापालिकेतर्फे लोकशाही पंधरवडा साजरा करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील सेंट जोसेफ ज्यूनिअर कॉलेज, चांगू काना ठाकूर कॉलेज, महात्मा स्कूल व ज्यूनिअर कॉलेज इत्यादी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना महापालिका कामकाजाची माहिती देण्यासाठी निमंत्रित केले होते, या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. या वेळी उपआयुक्त जमीर लेंगरेकर, नगरसेविका चारुशीला घरत, शासकीय बी. एड. महाविद्यालयाचे प्रा. संजीवनी पेठणकर आदी उपस्थित होते. लोकशाही पंधरवडा हा केवळ 15 दिवसांसाठी साजरा न करता तो वर्षभर साजरा केल्यास यातून सर्व नागरीक जबाबदारीने प्रत्येक मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी व्यक्त केली. उपआयुक्त जमीर लेंगरेकर यांनी ही या वेळी लोकशाही पंधरवड्याचे महत्त्व विषद केले. महाविद्यालयीन विद्यार्थी या देशाचे भावी जबाबदार नागरिक आहेत, त्यांनी चांगले काय व वाईट काय याची खात्री करुन पुढे आयुष्याची वाटचाल करावी. आपल्या बरोबरच समाजातील इतर घटकांना लोकशाही प्रक्रीयेत सामावून घेण्यासाठी सतत प्रयत्न केल्यास यातून अप्रत्यक्ष आपल्या भारतीय राज्य घटनेला व लोकशाहीला हातभारच लागेल. देशातील तरुण प्रगल्भ झाले तरच आपली लोकशाही अधिक प्रगल्भ होईल असा विश्वास उपआयुक्त जमीर लेंगरेकर यांनी या वेळी व्यक्त केला. अल्ट्रास्टिक संस्थेचे प्रमुख विजय चव्हाण, सीकेटी कॉलेजचे प्राध्यापक सुर्यकांत परकाळे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना लोकशाही पंधरवडा बद्दल मार्गदर्शन केले. शेवटी, महापालिका निवडणूक विभाग प्रमुख कांतीलाल पाडवी यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयाचे आभार मानले. या वेळी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना उपआयुक्त लेंगरेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले, सुमारे 75 विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.
जनजागृतीसाठी शहरात होर्डिंग्ज
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पनवेल महापालिका क्षेत्रात प्रमुख ठिकाणी लोकशाही निवडणुका व सुशासन या विषयावर होर्डिंग्ज बॅनर्स लावण्यात आले आहेत. जागरुक नागरीक मी भारताचा हक्क बजावीन मतदानाचा तसेच माझा देश माझी लोकशाही टिकवीन ती लावून बोटाला शाई अशा आशयाच्या जिंगल्स स्थानिक टिव्ही केबल व रेडिओवर प्रसारीत करण्यात येत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.