Breaking News

चौल-रेवदंड्यात सुपारी उत्पन्नात कमालीची घट

रेवदंडा : प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात चौल, रेवदंडा, नागाव परिसरातील सुपारी वृक्ष मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडल्याने बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी बागायतीतून मिळणार्‍या सुपारीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

चक्रीवादळाच्या तडाख्यात बागायतीमधील असंख्य सुपारी वृक्ष पडले, तुटले होते. त्यामुळे  उत्पादन देणार्‍या सुपारी वृक्षांची संख्या आपोआप कमी झाली होती. त्याबरोबर बागायतदारांचे सुपारी उत्पादनाचे प्रमाणसुध्दा कमी झाले आहे. वर्षाकाठी दोन, पाच, दहा हजार सुपारीचे उत्पन्न देत असलेल्या बागायतीतून सध्या अल्प प्रमाणात सुपारी उत्पादन मिळत आहे. येथील रोठा जातीची सुपारी घाऊक व्यापारी स्थानिक व्यापार्‍यांकडून खरेदी करतात. मात्र बागायतदारांची स्थानिक व्यापार्‍यांना सुपारी पुरविण्याची क्षमता फारच कमी झाली आहे. त्यामुळे येथील बागायतदार मेटाकूटीस आले असून, त्यांना आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे. चक्रीवादळात नुकसान झालेल्या बागायतदारांना शासनाने मदत जाहीर केली, मात्र झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत फारच अल्प असल्याची तक्रार बागायतदारांची असून, अनेकांना या मदतीपासून वंचीत राहावे लागल्याने बागायतदारांची अवस्था दयनीय झाली आहे.

नव्याने सुपारी वृक्षांची लागवड केली तरी त्यापासून पुढील पाच ते दहा वर्षापर्यंत उत्पन्न मिळणार नाही. तोपर्यंत काय करायचे हा प्रश्न बागायतदारांसमोर उभा ठाकला आहे. नव्याने लागवडीसाठी चांगल्या प्रतीची सुपारी रोपटी शासनाने बागायतदारांना अल्प किमंतीत द्यावीत, अशीही मागणी होत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply