Sunday , September 24 2023

झिनेदिन झिदान यांची ‘संघवापसी’

रिअल माद्रिदच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारली

रिअल माद्रिद : वृत्तसंस्था

फुटबॉल विश्वातील नावाजलेल्या रिअल माद्रिद या क्लबच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा झिनेदिन झिदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच झिदान यांना संघाच्या सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

1902 साली सुरू झालेल्या रिअल माद्रिद फुटबॉल क्लबमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रशिक्षकपदावरून संभ्रमावस्था दिसून आली होती. कोपा डेल रे, चॅम्पियन्स ट्रॉफी, ला लिगा यासारख्या नामांकित स्पर्धांमध्ये रिअल माद्रिदला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षी मे महिन्यात झिनेदिन झिदानला प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर प्रशिक्षकपदी नियुक्ती झालेल्या ज्युलेन लोपेतेगुई यांचीसुद्धा ऑक्टोबर महिन्यात अवघ्या 139 दिवसांत प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी सँतियागो सोलारी यांची नियुक्ती केली गेली, मात्र सोलारी यांची कारकीर्ददेखील पाच महिन्यांमध्येच संपुष्टात आली. त्यामुळे आता प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

अखेर रिअल माद्रिदने प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा झिनेदिन झिदान यांची नियुक्ती करीत असल्याचे जाहीर केले. रिअल माद्रिदला पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानी पोहोचवण्याचा निर्धार झिदान यांनी व्यक्त केला आहे.

झिदान यांची कामगिरी

प्रसिद्ध फुटबॉलपटू झिदान यांनी 2016मध्ये रिअल माद्रिदच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने 149 पैकी 104 सामने जिंकले; तर फक्त 16 सामन्यांत संघाला पराभव स्वीकारावा लागला. आता पुन्हा एकदा त्यांच्या मार्गदर्शनाखाली रिअल माद्रिद कशी कामगिरी करतो, याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply