अभिनेते अरुण नलावडे यांचे गौरवोद्गार
पनवेल : रामप्रहर वृत्त : ’संस्कारभारती’ ही केवळ संस्कार देणारी नसून ती संस्कार जोपासणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी काढले. पनवेल येथील संस्कारभारतीच्या ’कलांजली’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले शहराच्या प्रगतीसाठी त्या शहराची सांस्कृतिक बैठक पक्की असावी लागते. ती पनवेलमध्ये आहे. येथे अनेक चांगले लोक ही बैठक पक्की करण्यासाठी कार्यरत आहेत याचा आनंद वाटतो, असे नलावडे यांनी सांगितले.
संस्कारभारती, कोकणप्रांताच्या पनवेल शाखेच्या वतीने नाटक, संगीत, नृत्य व रांगोळी अशा स्वरूपात कलांंजली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नाट्यशास्त्राचे जनक भरतमुनी जयंती, ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके व पु. ल. देशपांडे यांची जन्मशताब्दीपूर्ती आणि संस्कारभारतीचे अखिल भारतीय महामंत्री पद्मश्री डॉ. विष्णू वाकणकर यांचे जन्मशताब्दी वर्ष असे त्रिवेणी औचित्य साधून हा कार्यक्रम झाला. पनवेल येथील फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेविका दर्शना भोईर व संस्कारभारतीचे राज्याचे महामात्र संजय गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक दिलीप रामबक्ष व निवेदिका स्नेहल दामले यांचा गौरव करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते रांगोळी व कलाप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर रंगमंचावर मच्छिन्द्र पाटील आणि सहकार्यांचा पोवाडा, काव्यवाचन, बटाट्याची चाळ’ ही नाट्यकृती व अनिरुद्ध भिडे व सहकारी यांचे
गायन झाले.
पु. ल. देशपांडे, गदिमा व सुधीर फडके ही त्रिमूर्ती हा कलेचा अनमोल ठेवा आहे. त्यांच्या कलाकृतींचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आणि येथील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संस्कारभारती वर्षातून सहा उपक्रम राबवते. – वैजयंती बुआ, संस्कारभारती, पनवेल अध्यक्ष