चिरनेर : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील चिर्ले येथील इतिहास संशोधक तथा काव्यदरबार मंडळाचे अध्यक्ष के. एम. मढवी त्यांच्या निवासस्थानी पोपटी कविसंमेलन रंगले. या वेळी काव्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ जांभळे यांनी, सगुण साकार ईश्वराची उपासना आपण करतो तशी साहित्याची साधना करा. साहित्याला स्थळ काळाची मर्यादा नसते; तर शब्दभावना महत्त्वाच्या असतात, असे सांगितले.
जांभळे यांनी साहित्य वाड़मयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असे भाषण करीत वैचारिक पैलूंवर प्रकाश टाकला, तसेच काव्यवारसा जपण्याचे काम मंडळाकडून होत असल्याचा उल्लेखही आवर्जुन केला आणि मंडळाला 11 हजार रूपयांची मदत करून साहित्य समाजॠणाचा पायंडा घातला.
सह्याद्री साहित्य मंडळाचे अध्यक्ष कैलास पिंगळे यांच्या कार्याची काव्य दरबार मंडळाने दखल घेत, त्यांना परेन जांभळे साहित्य सरखेल स्मृती पुरस्कार जांभळे यांच्या हस्ते सपत्नीक देण्यात आला. या वेळी पिंगळे यांच्या सहधर्मचारिणी तथा उपशिक्षिका किमया पिंगळे यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. कैलास पिंगळे यांनी, साहित्य चळवळीची परंपरा असलेल्या उरण तालुक्याने ही चळवळ माझ्यात रूजविली. उरणला फार जुनी साहित्य परंपरा आहे. एक साहित्यिक म्हणून माझा जन्म उरणचा आहे असे सांगत समुद्र साहित्य संमेलन आता मर्यादित न ठेवता, त्याच्या कक्षा जिल्हाभरात रूंदावल्या जातील, असेही सांगितले. काव्य दरबाराचे प्रमुख के. एम. मढवी यांनी या कार्यक्रमाच उद्दिष्ट प्रास्ताविकामधून स्पष्ट केले. काव्य संमेलनात प्रकाश ठाकूर यांनी भारत मातेचे भूमिपुत्र ही वीररसातील कविता सादर करून रणसंग्रामाची निर्मिती केली. हरिश्चंद्र माळी यांनी पोपटीच्या शिंगा बिनधास खा या आगरी कवितेतून आगरी बोलीचा ठसका देताच, कवी-रसिकांना आगरी बोलीचा वेगळाच आनंद मिळाला. दिनानाथ पाटील यांनी राया मला कोकणचा निसर्ग दाखवा या कवितेतून लावणीचा शृंगार साकार केला. कैलास पिंगळे यांनी पत्ता या कवितेतून आपल्या हरविलेल्या गावाची तरल काव्य रचनेतून व्यथा मांडली. दत्तात्रेय म्हात्रे यांनी सुखाची सकाळ या काव्यातून विरत चाललेली सकाळ अनुभवली. शिवाजी मोकल यांनी सोन्यासारखा माझा गाव होता. मोहन म्हात्रे यांनी आगरी समाज माझा मानाचा, धनंजय गोंधळी यांनी आपण एवढेच करा, काशिनाथ मढवी यांनी सवित सूर्यनारायण, हरिभाऊ घरत यांनी रिटायर झालो, सविता पाटील यांनी साहित्य नगरी, चंद्रकांत मढवी यांनी आक्रोश, राजेंद्र नाईक यांनी घर कसे जपावे, राजश्री मढवी यांनी आपला दोघांचा संसार, चंद्रकांत पाटील यांनी कालची मानकू उलुसी व्हती, म. वा. पाटील यांनी जमिनीचा पैसा आल्यानं कविता सादर केली. अशाप्रकारे आगरी बोलीचा ठसका आणि गोडवा, तसेच वास्तवाचे भान ठेवणार्या भावमधुर कवितांचे सादरीकरण या वेळी झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र नाईक यांनी केले; तर उपस्थिांचे आभार प्रकाश ठाकूर यांनी मानले.