Breaking News

पनवेल होणार आणखी सुऽऽसाट; सत्ताधारी व अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार भूसंपादन प्रक्रिया; चार रस्त्यांच्या रुंदीकरणाचे नियोजन

पनवेल : बातमीदार

पनवेल शहरातील महात्मा गांधी रस्त्याची रुंदीकरण प्रक्रिया सुरू केल्यानंतर पनवेलच्या सत्ताधार्‍यांनी व महापालिकेने शहरातील इतर चार अरूंद रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे नियोजन केले आहे. अरूंद रस्त्यांमुळे होणार्‍या विविध समस्यांतून मार्ग काढण्यासाठी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी रस्ते रुंदीकरणाला प्राधान्यक्रम दिला आहे.

पनवेल तालुक्यात वाढती वाहनसंख्या, लोकसंख्या आदींच्या तुलनेत गावापासून शहर झालेल्या पनवेलमध्ये वाहतूक कोंडी ही मोठी समस्या झाली आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर 1993 साली मंजूर झालेल्या विकास योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या महात्मा गांधी रस्त्याची रुंदीकरण प्रक्रिया सकारात्मकपणे सुरू असताना पनवेलच्या सत्ताधार्‍यांनी व महापालिकेने शहरातील आणखी चार रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या सहा मीटर रूंद असलेले मार्ग 9.15 मीटर रुंदीचे करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी महापालिका जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागाकडून भूसंपादन प्रक्रिया राबविणार आहे. महापालिकेच्या खर्चाने भूसंपादन अधिकारी नेमून भरपाई, स्थलांतरण प्रक्रिया आणि पुनर्वसन अधिनियम-2013प्रमाणे राबविली जाणार आहे.

पनवेल महापालिकेच्या 18 फेब्रुवारीला होणार्‍या महासभेत भूसंपादन प्रक्रिया करण्यासाठी लागणार्‍या खर्चाचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे पनवेल महापालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक ए. ए. शेख यांनी सांगितले. विशेष म्हणजे या मुख्य रस्त्यांशिवाय शहरातील इतर लहान रस्त्यांचेदेखील रुंदीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ह्या रस्त्यांचे होणार रुंदीकरण

शहरातील आदर्श हॉटेल ते सावरकर चौक हा राम गणेश गडकरी मार्ग, मेवाड हॉटेल ते जयभारत नाका हा कापड बाजार मार्ग, जयभारत नाका ते विरूपाक्ष मंदिर ते सावरकर चौक हा महात्मा फुले मार्ग, जयभारत नाका अन्नपूर्णा हॉटेल ते सावरकर चौक हा लोकमान्य टिळक मार्ग अशा महत्त्वाच्या मार्गांचेदेखील रुंदीकरण केले जाणार आहे.

पनवेल शहराला नियोजनबद्ध शहर बनविण्यासाठी येथील रस्त्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्याच दृष्टीने पनवेल महापालिका प्रयत्न करीत आहे. महापालिकेच्या महासभेने मंजुरी दिल्यास पुढील प्रक्रिया राबवली जाईल. भूसंपादन अधिकारी नेमून भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याचा प्रयत्न असेल. -गणेश देशमुख, आयुक्त

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply