कर्जत : बातमीदार
आजच्या तरुण मुलामुलींना इतिहासाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे, तसेच त्यांनी शिवकालीन नाणी व त्यांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन इतिहासकार प्रशांत ठोसर यांनी येथे केले. निर्माण सामाजिक संस्थेने कर्जत नगरपालिकेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रशांत ठोसर शिवकालीन नाण्यांचा इतिहास व शिवाजी महाराजांचा असलेला संबंध या विषयावर बोलत होते. या वेळी त्यांनी काही नाणी विद्यार्थ्यांना दाखवून त्या नाण्यांचा शिवाजी महाराजांशी असलेला संबंध याविषयी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ इतिहासकार आप्पा परब यांनी या वेळी शिवकालीन इतिहासाची पुस्तके शाळेला भेट स्वरूपात दिली. या वेळी निर्माण सामाजिक संस्थेचे विराज ताह्मणे यांच्यासह प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर माध्यमिक शाळा व नगरपालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.