– भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा इशारा;
– मानसरोवर रेल्वेस्टेशनजवळील काम बंद करण्यासाठी दिली धडक
पनवेल ः प्रतिनिधी
सिडकोने 31 मेपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन करावे अन्यथा आम्ही तारीख जाहीर करणार नाही, मनात येईल तेव्हा सिडकोमध्ये घुसून सिडकोच्या अधिकार्यांना सळो की पळो करून सोडू, असा गर्भित इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 12) कामोठे येथे सिडको प्रशासनाला दिला आहे. सिडकोने वसविलेल्या कामोठेमध्येही गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. येथील नागरिकांना अनियोजित पाणीपुरवठ्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी सिडको कार्यालयात करण्यात आल्या आहेत. प्यायला पाणी नसतानाही सिडको मात्र नवीन प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र देत सुटली आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात कामोठे भाजपच्या वतीने सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा करण्यात आला असून अनियमित पाणी पुरवठ्याबाबत भारतीय जनता पक्षातर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कामोठे येथे गुरुवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात उपमहापौर सीताताई पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेविका अरुणा भगत, हेमलता गोवारी, कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, राजेश गायकर, राजेश म्हात्रे, महिला मोर्चाच्या कामोठे अध्यक्षा वनिता पाटील, अॅड. आशा भगत, विद्या तामखेडे, दिगंबर कुलकर्णी, हर्षवर्धन पाटील, हॅप्पी सिंग, शरद जगताप, जय पावणेकर, विनोद खेडेकर, नाना मगदूम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकसंख्या वाढली तरीसुद्धा सिडकोने नियोजन न केल्यामुळे अनियमित पाणी पुरवठा नित्याचे झाले. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोकडे भाजपच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. मात्र तरीदेखील सिडको नवनवीन प्रकल्पांना पाणी देत असताना त्यांना जुन्या गृहसंकुलांचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा या वेळी सिडकोला देण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले की, रहिवाशांना मुबलक आणि नियमित पाणी देण्यासाठी सिडकोने नियोजन केले पाहिजे, संबंधितांशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे, पण तसे अधिकारी करीत नाहीत, पण आता 31 मेपर्यंत योग्य नियोजन न केल्यास शांत बसणार नाही. सिडकोने गृहसंकुल उभारताना डेव्हलपमेंट चार्जेस घेतले आहेत आणि त्या अनुषंगाने पाणी, गटारे, रस्ते व तत्सम सुविधा देण्याचे कर्तव्य सिडकोचे आहे. आंदोलन केले की तेवढ्या पुरते नियोजन होते आणि नंतर सिडको पुन्हा भोंगळ कारभार करते, हा मनमानी कारभार चालणार नाही आणि हे आंदोलन शेवटचे नाही हे याद राखा, असा इशारा सिडकोला त्यांनी दिला. एसीच्या केबिनमध्ये बसून पाण्याशिवाय तडफडायला सिडकोचे अधिकारी लावत आहेत, त्यामुळे आता बस्सं झाले! जे आंदोलन करणार त्याची तारीख जाहीर करणार नाही तर मनात येईल त्या दिवशी सिडको कार्यालयात घुसून आंदोलन करणार आहोत आणि त्यावेळी अधिकार्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असेही त्यांनी सिडकोला ठणकावून सांगितले.
कर्नाळा बँक घोटळ्यावरूनही लगावला टोला…
शेकापच्या माजी नगरसेवकांच्या टीकेचा समाचार घेताना आमदारांनी आम्ही काय करायचे ते आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही या माय-भगिनींसाठी आम्ही मोर्चा काढला आहे, असे सांगून नवी मुंबई महापालिका झाली तेव्हाच पनवेल महापालिका झाली असती, पण त्या वेळी त्याला काही राजकीय पक्षांनी विरोध केला. शेकापचे नेते विवेकानंद पाटील यांनी कर्नाळा बँक घोटाळा करून 550 कोटी रुपये हडप केले त्याऐवजी कामोठ्यातील जनतेला पाणी देण्यासाठी खर्च केले असते तर आयुष्यभर तुमचे उपकार विसरले नसते. मी आज त्यांचा सत्कार केला असता, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
एक वर्षापासून आम्ही सर्व पाण्यावाचून हाल सोसत आहोत. फ्लॅटमध्ये राहत असताना प्रति व्यक्ती 125 लिटर दरदिवशी पाणी मिळणे क्रमप्राप्त आहे, मात्र सिडकोचे नियोजन ढिसाळ झाले आहे. आंदोलन करणार या धसक्याने दोन दिवस फरक पडला आहे. काही बाबतीत सिडको महानगरपालिकेकडे बोट दाखवून स्वतःची जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे सिडकोला आता मूठमाती द्यायची वेळ आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हक्कासाठी लढत राहू.
– दिगंबर कुलकर्णी, रहिवासी