Breaking News

भारताचा पहिला डाव गडगडला

न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात फलंदाज ढेपाळले

हॅमिल्टन : वृत्तसंस्था
न्यूझीलंडविरुद्धच्या तीनदिवसीय सराव सामन्यात  भारताचा पहिला डाव गडगडला. भारतीय संघावर पहिल्याच
दिवशी 263 धावांमध्ये गारद होण्याची वेळ आली. चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही, तर दोन फलंदाजांचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही.
येत्या 21 फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेआधी न्यूझीलंड अ संघाविरुद्ध भारताचा तीन दिवसांचा सराव सामना शुक्रवार (दि. 14)पासून सुरू झाला. या सामन्यातील पहिल्या डावात भारताचे आठ फलंदाज अपयशी ठरले. दिलासा देणारी बाब म्हणजे चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी भारताचा डाव सावरला.
वनडे मालिका गमावल्यावर भारतीय संघ भटकंतीसाठी गेला होता. त्यांच्या या भटकंतीचे फोटो चांगलेच वायरल झाले होते, पण सुटी एन्जॉय केल्यानंतर भारतीय संघाला मैदानात चमक दाखवता आलेली नाही. हनुमा विहारीचे शतक आणि चेतेश्वर पुजाराने 93 धावा केल्यामुळेच भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा तो चांगलाच अंगलट आला; कारण प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात सपशेल अपयश आले. या सामन्यात पृथ्वी शॉ भोपळाही फोडू शकला नाही, तर सलामीवीर मयांक अगरवालला एकाच धावावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर शुभमन गिल, वृद्धिमान साहा आणि आर. अश्विन हेही शून्यावर तंबूत परतले.
हनुमा विहारी आणि चेतश्वर पुजारा यांची या वेळी भारताचा डाव सावरला. विहारीने 10 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 101 धावा केल्या. शतकानंतर त्याला निवृत्ती घ्यावी लागली. पुजाराने 11 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 93 धावा केल्या. त्याचे शतक फक्त सात धावांनी हुकले. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर अवांतर धावा (26) होत्या. भारताचा पहिला डाव 78.5 षटकांत 263 धावांमध्ये संपुष्टात आला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply