सिद्धार्थनगरात चार लहान मुले जखमी
खालापूर : प्रतिनिधी
खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू असून, सिद्धार्थनगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक लहान मुलांना चावा घेत जखमी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर घटनेकडे नगर परिषद लक्ष देत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
खोपोलीतील सर्वच ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने विशेषत: रात्रीच्या वेळी वाहने चालविताना कुत्री चालकांच्या अंगावर धावल्याने अपघात घडत आहेत. नागरिकांनाही कुत्रा चावल्याच्या तक्रारी पालिकेत केल्या, मात्र पालिकेने या भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा वेळेत बंदोबस्त न केल्याने उच्छाद वाढला आहे.
शहरातील सिद्धार्थनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी कुबेर साळुंखे, मिंटी जगताप, समर्थ भिसे, जासमीन नामक या लहान मुला-मुलींना, तसेच नागरिकांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत.
भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांबाबत पालिकेत तक्रार संतोष मोरे यांनी केली असता पालिकेचे अधिकारी सिद्धार्थनगर आले व त्यांंनी पिसाळलेल्या कुत्र्याला जवळ बोलाविले कुत्रा जवळ येतो म्हणजे चावत नाही. त्यामुळे त्याला काहीच करू शकत नाही, असे म्हणाले, तर पिसाळलेला कुत्रा चावल्यावर पालिकेच्या रुग्णालयात त्यावरील इंजेक्शन उपलब्ध नसल्याने नागरिकांना जादा पैसे मोजून खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.
खोपोलीत मागील महिन्यात किमान 12 जणांना कुत्र्याने चावा घेतला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.