दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका इंग्लंडने जिंकली
सेंच्युरियन : वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेला तिसरा ट्वेन्टी-20 सामनादेखील थरारक झाला. प्रथम फलंदाजी करीत आफ्रिकेने इंग्लडसमोर 223 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडने कर्णधार इयान मॉर्गनच्या वादळी खेळीच्या जोरावर पाच चेंडू राखून विजय मिळवला आणि मालिकाही 2-1ने जिंकली. मॉर्गनच सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करीत 20 षटकांत 6 बाद 222 धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडकडून जोस बटलर, जॉनी बेयरस्टो यांनी अनुक्रमे 57 आणि 64 धावांची अर्धशतकी खेळी केली. याशिवाय कर्णधार मॉर्गन याने विक्रमी अर्धशतकी खेळी केली. त्याने फक्त 22 चेंडूंत सात षटकारांसह नाबाद 57 धावा केल्या आणि संघाला पाच विकेटस्नी विजय मिळवला. या खेळीत मॉर्गनचा स्ट्राइक रेट 259.08 इतका होता.
मॉर्गनने या सामन्यात 21 चेंडूंत अर्धशतक ठाकले. टी-20मधील ही चौथ्या क्रमांकाची, तर इंग्लंडकडून सर्वात वेगवान अर्धशतकी खेळी आहे. याआधी 2019मध्ये नेपियर येथे त्याने न्यूझीलंडविरुद्ध 21 चेंडूंत अर्धशतक केले होते. टी-20मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2015मध्ये आफ्रिकेविरुद्ध 17 चेंडूंत 50 धावा चोपल्या होत्या.
तिसर्या टी-20 सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 448 धावा केल्या. उभय संघांतील पहिले दोन्ही सामने थरारक झाले होते. पहिल्या सामन्यात इंग्लंडने दोन धावांनी, तर दुसर्या सामन्यात आफ्रिकेने एक धावाने विजय मिळवला होता.