Breaking News

रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. ही शिवजयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यानिमित्त मिरवणूक काढून महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा केला जातो. इतरही अनेक कार्यक्रम होतात. या पार्श्वभूमीवर मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकविणार्‍या या महान राजाच्या कार्याचा घेतलेला आढावा…

छत्रपती शिवाजीराजे भोसले (19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680) हे इ.स. 1818पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणार्‍या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य उभे केले. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीला शिवकाल असेही म्हणतात. शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या दोन हजार सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स.1630मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा, अशी प्रार्थना केली होती. म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदाचा मुद्दा होता. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 (शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630) ही शिवरायांची जन्मतारीख 2001 साली स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमध्ये वेगवेगळी तारीख दाखविलेली असते. हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी म्हणजेच 27 एप्रिल 1645 रोजी रायरेश्वराच्या मंदिरात येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती. पुढे 1647मध्ये 17 वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा (सिंहगड) आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. याशिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. शिवरायांनी स्वराज्याची सीमा दक्षिणेत तुंगभद्रेपर्यंत, तर उत्तरेत सातपुड्यापर्यंत नेली होती. सूर्याजी काकडे, वाघोजी तुपे, बाजी पासलकर, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक यांसारख्या हजारो मावळ्यांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून स्वराज्याचे स्वप्न साकार केले. लढाईच्या काळात त्यांनी कधी रयतेला त्रास दिला नाही की मराठी सैन्याने कुणाच्या स्त्रियांवर अत्याचार केला नाही. स्वराज्यनिष्ठा व पराक्रम यांसह सैन्य उभे करणे, विविध आक्रमणांना तोंड देणे, लढाया यशस्वी करीत गडकोट काबीज करणे हे करत असतानाच दुसर्‍या बाजूला शिवरायांची प्रशासनात्मक व रचनात्मक कामेही चालूच असत. शिवाजीराजांनी एक आदर्श शासनव्यवस्था उभी केली. सैन्याचा पगार केंद्रीय पद्धतीने देणे, सरदारांच्या बदल्या करणे, शेती व शेतसार्‍याबद्दल यंत्रणा लावणे, भूक्षेत्रानुसार शेतसारा निश्चित करणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रसंगी शेतसारा माफ करणे अशा अनेक महत्त्वाच्या व्यवस्था त्या काळात सुरू झाल्या. सहा महिने स्वराज्याच्या सैन्यात नोकरी व सहा महिने शेती करणे ही शिलेदारी व्यवस्था सुरू करून महाराजांनी प्रजेला दोन वेळची भाकरी मिळवण्याची आणि देशसेवा करण्याची संधी एकत्रितपणे दिली. त्यामुळे प्रजेला आर्थिक व सामाजिक सुरक्षितता प्राप्त झाली, तसेच स्वराज्याबद्दलची प्रजेची निष्ठा अधिकाधिक घट्ट होत गेली. इ.स. 1666 साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजीदेखील होता, परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच ते तेथून निसटले. शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व 23 किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांना लढताना वीरमरण आले. 6 जून 1674 रोजी शिवाजीराजांचा रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून राजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले गेले. याशिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला. अशा या जाणत्या राजाला त्रिवार वंदन!

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply