महाड : प्रतिनिधी
विकास कामात कोणी अडथळा आणू नये. मात्र रायगड मार्ग रुंदीकरणाच्या कामात गरज नसणारी वृक्षतोड ही अवैध असून, वृक्षतोडीचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी येथे दिला.
महाड – रायगड मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून, या कामात अनावश्यक तसेच दहा मिटरच्या बाहेर असणारी मोठे वृक्ष देखील तोडले जात असल्याची बाब काही सामाजीक आणि पर्यावरणप्रेमी संघटना आणि पत्रकारांनी सोमवारी आमदार दरेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्या नंतर आमदार दरेकर यांनी त्या ठिकाणी जाऊन पहाणी केली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकरणी चौकशीची मागणी करु, असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.
दरम्यान, हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी या वृक्षतोडी प्रकरणी नाराजी व्यक्त करत आमदार दरेकर यांना रायगड मार्गावरील वृक्ष तोड थांबविण्याची विनंती केली. तसेच पत्रकार महेश शिंदे यांनी 10 मिटर हद्दीच्या बाहेरील अनावश्यक वृक्षतोड चुकीची असल्याचे निदर्शनास
आणून दिले.
विकास आवश्यक आहे, मात्र विकासाच्या नावाखाली नियमबाह्य व अवैध वृक्षतोड खपवून घेतली जाणार नाही. महाड-रायगड मार्गाच्या रुंदीकरणात होत असलेल्या अनावश्यक वृक्षतोडीच्या चौकशीची सभागृहात मागणी करण्यात येईल.
-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते