मुंबई ः प्रतिनिधी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी 20 आणि एकदिवसीय मालिका नुकतीच संपली. भारताने टी-20 मालिका जिंकली, तर एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने विजय मिळवला. त्यानंतर आता न्यूझीलंडच्या भूमीवर दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. शुक्रवार (दि. 21)पासून या कसोटी मालिकेला प्रारंभ होईल. मालिकेसाठी दोन्ही संघ कसून तयारी करीत आहेत. यजमान न्यूझीलंड आणि भारत यांच्यात वेलिंग्टनच्या स्टेडियमवर पहिला सामना रंगणार आहे.
भारतीय संघाने यजमान संघाला धूळ चारण्यासाठी काही योजना आखल्या असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार संघ व्यवस्थापन टीम इंडियातील खेळाडू निवडतील. त्यामुळे सर्वार्थाने दमदार कामगिरी करण्याच्या उद्देशाने संघाची बांधणी करण्यात येईल. भारताचे अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघे दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर आहेत. त्यामुळे भारताला दोन नवख्या सलामीवीरांसोबत मैदानावर उतरावे लागणार आहे. त्यामुळे मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांच्यावर संघ व्यवस्थापन विश्वास दाखवू शकते. सुरुवात नवख्या खेळाडूंनी केल्यावर तिसर्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फारसा फरक दिसणार नाही. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे तिघे आपल्या क्रमांकावर खेळताना दिसतील, तर सहाव्या स्थानावर हनुमा विहारीला संधी मिळण्याची शक्यता आहे.
संघात यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतपेक्षा वृद्धिमान साहाला संधी मिळू शकते, तसेच भारतीय संघ मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह या तीन वेगवान गोलंदाजांसह उतरू शकतो. फिरकीपटूंमध्ये अश्विन आणि जडेजा यांच्यात शर्यत आहे, पण संघात एकही डावखुरा फलंदाज नसल्याने कदाचित जडेजाला संधी देण्यात येऊ शकते. सलामीवीर मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने अखेरच्या वन डे सामन्यात बाजी मारली. भारताने विजयासाठी दिलेले 297 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 5 गडी राखत पूर्ण केले. या विजयासह न्यूझीलंडने वन डे मालिकेत भारताला व्हाईटवॉश दिला आणि टी-20 मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला होता.
असा असू शकतो संघ – मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह