रेवदंडा ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील मिठेखार येथील मैदानात येसदे सत्संग क्रीडा मंडळ आयोजित भाजप चषक 2020 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत एम. सी. सी. चोरढे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, तर द्वितीय सत्संग येसदे, तृतीय यंगस्टार कोर्लई, चतुर्थ क्रमांक नूतन चेहेर व शिस्तबद्ध संघ बक्षीस शईनस्टार मिठेखार यांनी पटकावले. स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच एम. सी. सी. चोरढे संघाचा फवाद, तर मॅन ऑफ द सीरिज येसदे सत्संग संघाचा महेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली.
भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या प्रेरणेने सत्संग क्रीडा मंडळ येसदे यांच्या वतीने मिठेखार येथील मैदानात दि. 15, 16 व 17 फेब्रुवारी रोजी भाजप चषक 2020 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा शुभारंभ भाजपचे माजी सरचिटणीस अलिबाग विधान परिषद अॅड. परेश देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला, तर बक्षीस समारंभ भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रथम क्रमांकास 15 हजार रुपये व भव्य चषक, द्वितीय 10 हजार रुपये व भव्य चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकास पाच हजार 500 रुपये व भव्य चषक तसेच शिस्तबध्द संघ, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सीरिजसाठी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अंतिम विजेत्या एम. सी. सी. चोरढे संघास भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते रोख रक्कम व भाजप चषक प्रदान करण्यात आला.