Breaking News

‘महावितरण’चा ग्राहकांना शॉक

पोलादपूरमधील ग्रामपंचायती नोटिसीमुळे हवालदिल

पोलादपूर : प्रतिनिधी : पथदिवे आणि नळपाणीपुरवठा योजनांच्या थकीत बिलांपोटी निर्धारित देयके अदा न केल्याने विद्युतपुरवठा खंडित करण्याच्या  नोटिसा महावितरण कंपनीने पोलादपूर तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींना बजावल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायती हवालदिल झाल्या आहेत, मात्र सदरच्या नोटिसा ऊर्जा विभागाच्या शासननिर्णयाकडे दुर्लक्ष करून बजाविण्यात आल्याचा दावा सरपंच संघटनेचे अध्यक्ष संतोष मोरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केला आहे.

महावितरण कंपनीच्या पोलादपूर उपविभागामार्फत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना विद्युतपुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्याबाबत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच यांनी गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी यांच्याकडे विचारणा केली असता विद्युत देयकांचा भरणा शासन निर्णयानुसारच करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. महावितरणचे पोलादपूर उपकार्यकारी अभियंता सुद यांच्या नोटिशीनुसार विद्युतपुरवठा खंडित करण्याबाबत निर्णय झाल्यास पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भाग रात्री पथदिव्यांअभावी काळोखात राहील, तर पाणीयोजनांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्यास ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागणार आहे. त्यामुळे या नोटिशीच्या अंमलबजावणीच्या धास्तीने ग्रामपंचायती हवालदिल झालेल्या दिसून येत आहेत.

असा आहे शासन निर्णय

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत 16 मे 2018 रोजी सार्वजनिक पाणीपुरवठा आणि पथदिवे ग्राहकांच्या थकीत देयकांबाबत शासननिर्णय जारी केला आहे. यामध्ये 31 मार्च 2018 पूर्वीच्या ग्रामपंचायत भागातील पथदिव्यांच्या वीज देयकाची रक्कम ग्रामविकास विभागाने शासन अनुदान अथवा वित्त आयोगाच्या अनुदानातून महावितरणकडे वर्ग करावी, असा उल्लेख आहे, तर 31 मार्च 2018 नंतरच्या आस्थापित झालेल्या पथदिव्याच्या थकीत वीजदेयकांची रक्कम संबंधित ग्रामपंचायतीकडून महावितरणाला अदा करण्यात यावी, या पथदिव्यांसाठी नवीन वीजमीटर जोडण्यात यावेत, असा उल्लेख करण्यात आला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply