महाड : प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यासोबत मगरीही महाड शहरात आल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शहरातील गांधारी पूल आणि दस्तुरी नाका परिसरात या मगरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
महाडला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शहराजवळील सावित्री, गांधारी, काळ या नद्या दुथडी भरून वाहिल्या. या पुराच्या पाण्यातून सर्प, कीटक आदी जलचर नेहमीच येत असतात, पण आता पाण्यासोबत मगरी आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केंबुर्ली, नवेनगर येथील मिलिटरी कॅन्टीन परिसरात सावित्री नदीमध्ये मगरींचे वास्तव्य आहे. उन्हाळ्यात या मगरी पाहण्यासाठी एकच गर्दी असते, पण या मगरी शहरातील महामुणकर हॉस्पिटल आणि गांधारी पुलावर आल्याचे दोन व्हिडीओ सध्या सर्वत्र पसरले आहेत. त्यामुळे भीती व्यक्त होत आहे. वन विभागाने याची दखल घ्यावी, तसेच प्राणीमित्रांनीही या व्हिडीओंची सत्यता पडताळून उपाययोजना करण्यासाठी पुढे येण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.