पनवेल : प्रतिनिधी : नवीन पनवेलमधील उघड्या डीपीमुळे नागरिक आणि लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही महावितरणच्या अधिकार्यांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
नवीन पनवेल मधील सेक्टर 12 मधील रस्ता नं. 11 वरील प्लॉट नं. 14 जवळ रस्त्याला लागून महावितरणचा डीपी आहे. या डीपीला झाकण नाही त्यावर साधे प्लास्टिकचे कापड लावून ती झाकली आहे. पावसाने ते कापड फाटले असून आतले वायरिंग उघडे पडले आहे. हा रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणाहून वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूला झाल्यास तेथे हात लागू शकतो किंवा खेळणार्या मुलांचा या उघड्या डीपीला धक्का लागल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे दुर्घटना होण्याची वाट न पाहता लवकरात लवकर महावितरणच्या अधिकार्यांनी या उघड्या डीपीला झाकण बसवावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे.