Breaking News

खालापूर येथे हिंदू गर्जना मोर्चा; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले नेतृत्व

खोपोली, चौक : प्रतिनिधी
गोमातेचे रक्षण व्हावे, अवैध कत्तलखाने बंद करावेत, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जावी तसेच गोरक्षक व पोलिसांच्या सुरक्षेची मागणी करीत सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 9) खालापूर तहसील कार्यालयावर हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला होता. समाजकंटकांवर पोलीस आणि प्रशासनाची जरब बसली तरच गैरकृत्ये बंद होतील, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी अधोरखित केले.
महिन्यापूर्वी खोपोलीजवळील हाळ गावात गोवंश हत्येनंतर उद्रेक झाला होता. खालापूर पोलिसांनी तातडीची कारवाई करीत 18 आरोपींना ताब्यात घेतले. शिवाय तालुक्यातील मुस्लिम बांधवांनीदेखील या घटनेचा निषेध करत गोरक्षणासाठी पुढाकार घेणार असल्याचे पत्र रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले होते. त्यामुळे तणाव निवळला, परंतु भविष्यात अशा घटना घडू नये तसेच अटक आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी बुधवारी खालापूर फाटा ते तहसील कार्यालय अशा हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन सकल हिंदू समाज खालापूरतर्फे करण्यात आले होते. मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. या मोर्चा मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी गोवंश पूजन केल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. खालापूर तहसील आवारात मोर्चा अडविण्यात आला. या वेळी मागील निवेदनावर काय कारवाई झाली याची माहिती तहसीलदार अभय चव्हाण व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या उपस्थितीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली.
खालापुरातील अनेक बेकायदा कृत्यांवर कारवाई झाली असून उर्वरित राहिलेल्या काही मुद्द्यांवर आठ दिवसात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार अभय चव्हाण व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी दिले. त्यावर येत्या पंधरा दिवसांत आपण उपविभागीय पोलीस अधिकारी यांचीही भेट घेणार असून खोपोली येथील गुन्हेगारीवर नियंत्रण न आल्यास तेथील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
मोर्चेकर्‍यांनी तहसीलदार चव्हाण यांना निवेदन दिले असून अवैध कत्तलखान्यावर कारवाई तसेच गोवंश हत्या प्रकरणात हिंदू समाजाच्या भावना पत्राद्वारे शासनापर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले आहे.
या मोर्चावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, तालुका मंडळ अध्यक्ष यादव, खोपोली शिवसेना नेते राहुल गायकवाड, सकल हिंदू समाज संघटक राकेश मिरवणकर, तालुका निमंत्रक संकेत पाटील, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, भाजप तालुका उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्यासह सकल हिंदू समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चामध्ये महिलांची संख्यादेखील लक्षणीय होती. यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी खालापूर पोलीस ठाण्यात जाऊन कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेतली.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply