शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या महाडच्या शिवकालीन श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव दरवर्षी माघ वद्य एकादशी ते फाल्गुन शुध्द 3 पर्यत साजरा केला जातो. वर्षी बुधवार 19 फेब्रुवारीपासुन उत्सवाला सुरवात झाली. उत्सवाची सांगता बुधवार 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. छबिना उत्सवाचे वैषिष्ठ्य म्हणजे या उत्सवा मध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात, हा उत्सव बंधुभाव आणि एकात्मतेचा उत्सव म्हणुन साजरा केला जातो. शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा उत्सव म्हणजे महाडकरांना पर्वणी असते.
महाडच्या श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना यात्रेचे महत्व अनन्य साधारण आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षांतील एकादशीला सुरु होणार्या उत्सवाची सांगता फाल्गुन शुध्द द्वितीयेला लळीताच्या किर्तनाने केली जाते. श्री वीरेश्वर महाराज, ग्रामदेवता श्री जाकमाता, नात्याचे रवळनाथ, विन्हेरे विभागाची श्री झोलाई देवी, त्याच बरोबर दासगाव, गोठे, पाले, चोचिंदे, शिरगाव या गावांतुन देव देवतांच्या पालख्या द्वितीयेच्या बिजेला आपला मोठा भाऊ श्री वीरेश्वर महाराजांना भेटण्यासाठी वाजतगाजत मोठ्या भक्ती भावाने विरेश्वर महाराजांच्या मंदिरात येतात. हेच छबिना यात्रेचे अधिष्ठान असते. या उत्सव काळा मध्ये येणारा महाशिवरात्र उत्सव महत्वाचा असल्याने या दिवशी श्री जाकमाता देवीची पालखी मिरवणुक काढण्यांत येते. श्री जाकमाता देवी पालखीने श्री वीरेश्वर मंदिरा मध्ये तीचे आगमन झाल्या नंतर संपुर्ण उत्सव काळा मध्ये तीचा मुक्काम मंदिरा समोर असलेल्या श्री कोटेश्वरी देवीच्या मंदिरा मध्ये असतो. छबिना उत्सव ज्या रात्री साजरा करण्यांत येतो त्या रात्री महाड, पोलादपुर, माणगाव, गोरेगाव इत्यादी दक्षिण रायगड जिल्ह्यांतील लाखो भाविक श्री वीरेश्वर महाराजांचे दर्शन घेण्या साठी आवर्जुन येतात. या यात्रे निमित्त मंदिराच्या सभोवतालच्या परिसरांमध्ये दुकाने थाटली जातात. त्याच बरोबर मोठे मोठे आकाश पाळणे, चक्र, मेरिगोराऊंड यात्रे मध्ये येत असल्याने यात्रेचे स्वरुप भव्यदिव्य झाले आहे. चाळीस वर्षा पुर्वी श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव मर्यादित साजरा केला जात होता. दिड दिवसाची यात्रा साजरी केली जात होती, परंतु गेल्या कांही वर्षा मध्ये यात्रेचे स्वरुप भव्य झाल्याने आठ दिवस संपुर्ण शहरांमध्ये श्री वीरेश्वर जत्रा साजरी केली जात असल्याचे चित्र दिसुन येते. या आठ दिवसा मध्ये मंदिरा जवळ असलेल्या गाडी तळ मैदानामध्ये विविध वस्तुंची दुकाने, मिठाईची दुकाने छोटी हॉटेल्स मांडली जातात. त्याच बरोबर संपुर्ण राज्यांतुन वेगवेगळे व्यापारी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी येत असल्याने शहरांतील अन्य भागांतही दुकाने मांडली जात असल्याने यात्रेचे स्वरुप दिवसे दिवस वाढत असल्याचे दिसुन येते.
श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव आठ दिवस साजरा होत असल्याने या उत्सव काळा मध्ये सर्व व्यवस्था देवस्थान ट्रस्टचे संरपंच दिलीप शेट पार्टे उपाध्यक्ष रमेश नातेकर, विश्वस्थ दिपक वारंगे, अनंत शेट, वसंत गोगावले, चेतनकुमार रत्नपारखी, संजय पवार, गणेश वडके यांच्या मार्गदर्शना खाली पाहीली जाते. उत्सवा पुर्वी ग्रामसभेचे आयोजन करण्यांत येते. या वर्षी माजी नगराध्यक्ष सुर्यकांत शिलिमकर यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यांत आलेल्या ग्रामसभे मध्ये उत्सव कमेटीची स्थापना करण्यांत आली. या मध्ये कमेटीचे अध्यक्ष समिर बुटाला आणि उपाध्यक्ष हेमंत चांदलेकर यांची निवड करण्यांत आली. उमेश जगता, लल्ला रत्नपारखी, अनिल सलागरे, सुभाष मेहता, अण्णा गोरेगावकर, सुनिल पलंगे, विजय जाधव, संतोष घरटकर यांच्यासह अनेक शिवभक्त सहकार्य करतात. दरवर्षी उत्सवाचा वाढता प्रपंचा सोबत परिसराचा विकास भक्त मंडळीसाठी निवासी व्यवस्था, श्री वीरेश्वर सभागृहा मध्ये नव नवीन सुविधा उपलब्द करुन् देणे. त्याच बरोबर श्री वीरेश्वर तळ्याच्या सभोवतालचा परिसर सुषोभित अद्ययावत असे खुले मंगलकार्यालय उभारण्याचा मानस विश्वस्थांचा आहे. विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या विषेश प्रयत्नांने महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागा शासन निर्णय क्र.रा.स.यो.-2019 प्र.क्र.160 /ता.क.दि.18 सप्टेंबर 2019 नुसार श्री वीरेश्वर तलावाचे संवर्धन आणि सुशोभिकरण प्रकल्पासाठी 2 कोटी 51 लाख रुपयांचा निधी मंजुर उपलब्द होत आहे. या मध्ये राज्य शासनाचा हिस्सा 70 टक्के आणि उर्वरित 30 टक्के देवस्थानचा राहाणार आहे. या पुर्वी देवस्थानच्या सरपंच पदाची जबाबदारी स्वर्गिय दगडुशेट पार्टे यांच्या कडे होती. सुमारे तीस वर्षे त्यांनी सरपंच पदाच जबाबदारी संभाळली, त्यांच्या कारकीर्दीमध्ये मंदिर आणि मंदिरा सभोवतालच्या अनेक सुधारणा करण्यांत आल्या, भव्य सभागृहाची उभारणी त्यांच्याच कार्यकाळा मध्ये पुर्ण झाली. त्या नंतर सरपंच पदाची जबाबदारी अनंत शेट यांच्या कडे देण्यांत आली. पाच वर्षाच्या कार्यकाळा नंतर स्वर्गिय दगडू शेंट पार्टे यांचे चिरंजीव दिलीपशेट पार्टे सरंपच पदी विराजमान झाले. त्यांच्या कार्यकाळा मध्ये अनेक सुधारणा करण्यांत आल्या, आजह ग्रामस्थांच्या आग्रहास्तव दिलीपशेट पार्टे सरंपच पदाची जबाबदारी सभांळीत आहेंत.
श्री वीरेश्वर देवस्थानचा इतिहास मोठा रंजक आहे. मंदिराचा मुळ गाभारा शिवकालीन आहे. 1756 च्या काळा मध्ये रायगड किल्याचे सरदार यशवंतराव पोतनिस होते. त्यांच्या अख्यत्यारीमध्ये महाड तालुक्याचा बराचसा परिसर होता. यशवंतराव पोतनिस यांनी कर्नाटकांतुन कारागिर आणुन हेमाडपंथी श्री वीरेश्वर मंदिर बांधले, आणि बारा बलुतेदारांना मानाचे स्थान दिले, तेंव्हा पासुन छबिना उत्सवाला सुरवात झाली. त्या साठी देवदेवतांचे अधिष्ठान आणि बिजेच्या पहाटे पर्यत सासन काठ्या खालु बाज्यावर नाचविल्या जातात. पुर्वी या यात्रे मध्ये महाड आणि पोलादपुर तालुक्यांतील देवदेवतांच्या 74 पेक्षा अधिक पालख्या येत होत्या. त्यांच्या सोबत सासन काठ्या येत असत. पोतनिसांचे मुळ गाव भोर असल्याने या गावची देखिल पालखी यात्रेमध्ये येत होती. त्यावेळी आठ दिवस यात्रा भरविली जात होती.
दक्षिण रायगड जिल्ह्यांतील सर्वात मोठी यात्रा असल्यामुळे प्रशासना कडूनही जय्यत तयारी केली जाते़. यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक महाड नगरीमध्ये येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्ता मध्ये वाढ करण्यांत आली आहे. त्याच बरोबर उत्सव काळा मध्ये वाहातुकीचे मार्ग देखिल बदलण्यांत आले आहेंत. नगरपालिके कडून स्वच्छता गृह, आरोग्य, पिण्याचे पाणी त्याच बरोबर आपत्कालीन व्यवस्था करण्यांत येते. यात्रा शांतते आणि आंनदी वातावरणांमध्ये साजरी करण्याचे आवाहन श्री वीरेश्वर देवस्थानचे सरपंच दिलीपशेट पार्टे आणि त्यांच्या सहकार्यानी केले असुन प्रशासनाने देखिल नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
-महेश शिंदे