महाड : प्रतिनिधी
येथील रोटरी क्लबच्या वतीने एका छोटेखाणी कार्यक्रमात महाडमधील चार प्राथमिक शाळांना आणि गोरेगावमधील एका शाळेला हॅन्डवॉश सेंटर, एसटीकरिता व्हीलचेअर आणि जनकल्याण रक्तपेढीला शीत शवपेटीचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब महाडच्या वतीने ग्रामीण भागातील कांबळे तर्फे महाड येथील मराठी आणि उर्दू शाळा तसेच लोणेरे, शिंदेकोंड, वहूर येथील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना हात धुण्याकरिता लागणारे हॅन्डवॉश उपलब्ध करून देण्यात आले. तसेच दिव्यांग व्यक्तींना बसमध्ये चढताना होणारा त्रास कमी करण्यासाठी महाड एसटी आगाराला व्हीलचेअर आणि शहरातील जनकल्याण रक्तपेढीला शीत शवपेटी देण्यात आली. रोटरीचे शैलेश पालेकर, पंचायत समितीच्या वरिष्ठ विस्तार अधिकारी सुनिता पालकर, महाड रोटरी अध्यक्ष राजेंद्र मेहता, पुणे येथील श्री. मराठे यांची यावेळी समयोचीत भाषणे झाली. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष स्व. नितीन मेहता यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला मंजू फडके, महाड रोटरीचे सचिव संतोष नगरकर, प्रदीप शेठ, संजय शेठ यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.