Breaking News

खोपोली पालिकेची दिरंगाई; रस्त्यासाठी ताकई ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा

खोपोली : प्रतिनिधी

निधी मंजूर होऊनही ताकई रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास खोपोली नगरपालिकेकडून दिरंगाई केली जात आहे, त्यामुळे संतप्त ताकई ग्रामस्थांनी नगरपालिका कार्यालयात जावून मुख्याधिकारी गणेश शेटे यांची भेट घेतली व ताकई रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरूवात केली नाही, तर आमरण उपोषण करण्याचा  इशारा दिला.        

खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई रस्त्याची दुरावस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य परसले आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, यासाठी ताकई ग्रामस्थ वारंवार मागणी करीत आहेत. फडणवीस सरकारच्या काळात एमएमआरडीएच्या माध्यमातून या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी 4.50 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. मात्र नगरपालिकेकडून ग्रामस्थांना वेळोवेळी आश्वासन देवूनही या रस्त्याचे काम सुरु होत नव्हते.

दरम्यान, या रस्त्याच्या कामात काही बांधकामे येत असल्याने ग्रामस्थ व मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी बैठक घेत सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याला दोन तीन महिने उलटून गेले तरीही रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नव्हती. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नगरपालिका कार्यालयात मुख्याधिकारी गणेश शेटे यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.

या वेळी उपनगराध्यक्षा विनिती कांबळी, नगरसेवक मोहन औसरमल, ताकईचे किशोर पाटील, अ‍ॅड. रामदास पाटील, अतुल पाटील, जयवंत पाटील, मंगेश पाटील, संदेश पाटील, राकेश पाटील, रमाकांत पाटील, रणजीत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आठ दिवसात रस्ता कॉक्रीटीकरणाचे काम सुरू न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा ताकई ग्रामस्थांनी दिला.

काँक्रीटीकरण करून ताकई रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न कायमचा सोडवावा, यासाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा नगरपालिकेला साकडे घातले आहे. फडणवीस सरकारच्या काळात  या रस्त्यासाठी 4.50 कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. नगरपालिकेने आठ दिवसात या रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा ग्रामस्थ आमरण उपोषण करतील.

-किशोर पाटील, ग्रामस्थ, ताकई, खोपोली.

ताकई रस्त्याच्या कामाला तांत्रिक मंजूरी घेवून तातडीने कामाचे टेंडर काढण्यात येईल. शासनाकडून निधी उपलब्ध होताच कामास प्रारंभ करण्यात येईल. – गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली नगरपालिका

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply