Breaking News

‘तो’ बॉम्बस्फोट नव्हता! पोलिसांचा निर्वाळा

मुरूड : प्रतिनिधी : शहरातील अजित जोशी यांच्या घरात 30 नोव्हेंबर 2018 रोजी गॅस गळतीमुळे स्फोट झाला होता, तो बॉम्बस्फोट नव्हता, अशी माहिती मुरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर साळे यांनी दिली. मुरूड शहरातील काही नागरिकांनी काही दिवसांपूर्वी  तहसीलदारांना निवेदन देऊन अजित जोशी यांच्या घरात झालेल्या स्फोटाविषयीची पोलिसांकडून सविस्तर माहिती मिळावी, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयात तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या सभेत पोलीस निरीक्षक किशोर साळे नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. अजित जोशी यांच्या घरगुती गॅस सिलिंडरची पीन दबल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. या गॅसचा विजेशी संपर्क येताच मोठा आवाज होऊन घराला आग लागली असल्याचे किशोर साळे यांनी या वेळी सांंगितले. गॅसचा स्फोट झाला, तर केवळ 6 मीटर क्षेत्र बाधित होते, मात्र या स्फोटात तीन किलोमीटर क्षेत्राला हादरे बसले आहेत, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत संजय डांगे यांनी व्यक्त केले. या स्फोटाबद्दलचा हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा अहवाल व शासकीय प्रयोगशाळेचा रिपोर्ट देण्याची मागणी या वेळी प्रकाश वीरकुड यांनी केली. त्यावर सदरचे अहवाल प्राप्त होताच त्याची माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले. मुरूडमध्ये सर्व शासकिय यंत्रणा जागृत असून नागरिकांनी कोणतीही शंका व्यक्त करून घबराटीचे वातावरण पसरवू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक साळे यांनी उपस्थित नागरिकांना केले. संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश वीरकुड, नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, माजी नगरसेवक प्रभाकर मसाला, बबन खोत, दत्ता भोसले, बाळकृष्ण गोंजी, संजय डांगे, उदय चौलकर, नजीर फहीम यांच्यासह नागरिक या सभेस उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply