Breaking News

कर्नाळा बँक ठेवीदारांची शनिवारी पनवेलमध्ये बैठक

पत्रकार परिषदेचेही आयोजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवून न्याय देण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी (दि. 21) दुपारी 3 वाजता पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात ठेवीदारांची बैठक, तर सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत सुप्रसिद्ध सनदी लेखापाल माजी खासदार किरीट सोमय्या हे ठेवीदारांना मार्गदर्शन करून पुढील दिशा विषद करणार आहेत. या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष महेश बालदी, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती असणार आहे.
कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) मोठा दणका बसला आहे. विवेक पाटील यांची तब्बल 234 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनेक अन्य ठिकाणच्या जमिनींचा समावेश आहे. कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी सर्वप्रथम कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीने आवाज उठवला होता. ठेवीदारांना न्याय मिळून घोटाळेबाजांवर कारवाई व्हावी यासाठी ठेवीदार संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावाही केला. त्याला यश येऊन 529 कोटींच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले शेकाप नेते विवेक पाटील यांना जून महिन्यात मुंबई ईडीकडून त्यांच्या निवासस्थानाहून अटक करण्यात आली होती. राज्य शासनाचे गृहखाते अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर ईडीला कारवाई करावी लागली.
या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार विवेक पाटील सध्या तळोजा कारागृहात आहेत. दीड वर्षांपूर्वी ठेवी स्वीकारण्याला व कर्ज वितरणावर निर्बंध आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा परवाना नुकताच रिझर्व्ह बँकेने रद्दबातल केला तसेच विवेक पाटील यांची तब्बल 234 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. बँक बुडाल्यास ग्राहकांना यापुढे 90 दिवसांत त्यांचे पैसे परत मिळण्याच्या डीआयसीजीसी सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानुसार बँक बुडाल्यास पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम 90 दिवसांत ग्राहकांना परत मिळणार आहे. कर्नाळा बँक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती सतत प्रयत्नशील असून यापुढील दिशा ठेवीदारांना अवगत करण्यासाठी या बैठकीचे व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply