Breaking News

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी (दि. 8) दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. किनारपट्टीवरील भागात पावसाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, पुढील काही दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदी किनार्‍यावरील तसेच डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळापासून किनारपट्टीवरील भागात पावसाला सुरूवात झाली होती. म्हसळा, तळासह श्रीवर्धन तालुक्यात पावसाची संततधार कायम होती. सोमवार सकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाला सुरूवात झाली. सकाळच्या सत्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे नद्या, नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. सखल भागात पाणी शिरणे, वृक्ष उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे यासारख्या घटना घडल्या. जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोविस तासात सरासरी 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. श्रीवर्धन येथे सर्वाधिक 245 मिमी, म्हसळा 213मिमी, तळा 182मिमी, रोहा 145मिमी, माणगाव 121मिमी, पोलादपूर 113मिमी, मुरूड 102मिमी, महाड 89मिमी पावसाची नोंद झाली. उत्तर रायगडातील अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, खालापूर, उरण तालुक्यात तुलनेत कमी पाऊस नोंदवला गेला. मात्र सोमवारी सकाळपासून या तालुक्यातही पावसाने जोर धरला. गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी चिंतातूर होते. मात्र पावासाला पुन्हा सुरूवात झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भात रोपे करपण्याची चिंता मिटली आहे. जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत 66टक्के पावसाची नोंद झाली आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply