ममतांच्या बालेकिल्ल्यात अमित शहा गरजले
कोलकाता ः वृत्तसंस्था
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या कोलकातामध्ये रविवारी (दि. 1) जाहीर सभा घेतली. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए)ला विरोध करीत आहेत, पण आम्ही सीएएवरून मागे हटणार नाही असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतासह राज्यात सत्तेत येईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
कोलकाताच्या शहीद मैदानात सीएएच्या समर्थनात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शहा बोलत होते. विरोधी पक्षात असताना ममता बॅनर्जींनी शरणार्थींच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीएए कायदा आणलाय, तर ममता बॅनर्जी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत जाऊन विरोध करीत आहेत. ममता या अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करीत आहेत, असे शहा म्हणाले. सीएएमुळे नागरिकत्व देण्यात येते. कुणाचे नागरिकत्व काढून घेतले जात नाही. त्यामुळे सीएएचा अल्पसंख्याकांवर कुठलाही परिणाम होणार नाही, असेही शहा यांनी स्पष्ट केले.
आगामी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताने सत्तेत येईल. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आम्हाला प्रचार करू दिला नाही. हेलिकॉप्टर उतरू दिले गेले नाही. उलट गोळीबार केला गेला. 40हून अधिक कार्यकर्ते त्यात ठार झाले. तरीही ममता बॅनर्जी भाजपला रोखू शकल्या नाही. ’आर नॉई अन्याय’ म्हणजे आणखी अन्याय सहन करणार नाही हा नारा पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल घडवेल, असा दावा अमित शहा यांनी केला. सत्ता आल्यावर आम्ही ’शोनार बंगाल’ घडवून दाखवू, असेही ते म्हणाले.
2014मधील निवडणुकीत भाजपला 87 लाख मते मिळाली. 2019मध्ये ही संख्या वाढून 2.3 कोटी झाली. राज्यातून भाजपचे 18 खासदार संसदेवर निवडून आले. हा सिलसिला आगामी निवडणुकीतही कायम राहील. भाजप दोन-तृतीयांश बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन करेल, असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला.
देशाची शांतता भंग करू देणार नाही
आम्हाला संपूर्ण जगात शांतता हवी आहे. आपल्या 10 हजार वर्षांच्या इतिहासात भारताने कधीही कुठल्या देशावर हल्ला केला नाही. आम्हीसुद्धा कोणाला आमच्या देशाची शांतता भंग करून देणार नाही. जे कोणी सैनिकांचे प्राण घेतील, त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी (दि. 1) पाकिस्तानला दिला. पश्चिम बंगालच्या राजारहाट येथे नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (एनएसजीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दहशतवाद कुठल्याही परिस्थितीत सहन करायचा नाही, हे आमचे धोरण आहे. एनएसजीची त्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यानंतर देशाच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. सरकार एनएसजीला चांगल्या सुविधा, घर नक्की देईल. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांच्या गरजांची पूर्तीही करेल, पण युद्ध हे हत्यारांवर नाही, तर शौर्यावर जिंकले जाते, असे ते म्हणाले.