Breaking News

सहयोग गोशाळा एक स्तुत्य उपक्रम

आपल्या देशात गाय हा संवेदनशील विषय ठरला आहे. गोहत्येवरून वाद होत आहेत. गोवंशाचे संरक्षण व्हायला पाहिजे, असे सर्वच बोलत असतात. गोमाता हे हिंदू समाजाचे श्रध्दास्थान, परंतु श्रध्देच्या पलीकडे जाऊन भारतीय गोवंशाकडे पाहिले जात नाही.  गोवंशाची हत्या करू नये म्हणून सांगायचे, परंतु  गोवंशाचे  पालन व संवर्धन  करण्यासाठी कुणी पुढे येत नाही. भारतीय गायींचे पालन व संवर्धन  करण्यासाठी अलिबाग येथील सहयोग गोपालन व गोसंवर्धन मंडळाने पुढाकार घेतला आहे. केवळ विचार करून हे मंडळ थांबले नाही तर त्या विचाराला कृतीची जोड दिली आहे. अलिबाग तालुक्यातील देऊळ भेरसे येथे त्यांनी गोशाळा प्रकल्प सुरू केला आहे. पाच गायींपासून सुरू केलेल्या या गोशाळेत अवघ्या दोन वर्षांत गोवंशाची संख्या 51वर गेली आहे आणि ती पुढे वाढतच राहणार आहे.

भारतीय गोवंशाची महत्तता अलीकडच्या काळात सांगितली जात आहे, परंतु त्यांचे पालन व संवर्धन करण्यासाठी कुणी पुढे येत नाही. आपण एखादी गोशाळा सुरू करावी, असा विचार रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात ज्यांचे नाव आवर्जून घेतले जाते असे गिरीश तुळपुळे यांच्या मनात आला. तो त्यांनी आपले मित्र नंदकुमार चाळके, महेश देशमुख,  सतीश पाटील तसेच इतर सहकार्‍यांना बोलून दाखवला. त्यांनाही तो पटला, परंतु जागेची अडचण होती. गोशाळेसाठी पुरेल एवढी जागा नव्हती. नंदकुमार चाळके व महेश देशमुख यांची अलिबाग तालुक्यातील खानाव

ग्रामपंचायतीच्या हद्दीतील देऊळ भेरसे येथे 24 गुंठे जागा होती. ती आपण देऊ, असे दोघांनी सांगितले, परंतु ही जागा पुरेशी नव्हती.

तरीदेखील छोट्या प्रमाणात का असेना गोशाळा सुरू करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला आणि तो अमलात आणण्याचा चंग बांधला. गोशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तरी तो अमलात आणणे सोपे नव्हते. त्यात काही अडचणी होत्या. त्यामुळे सहयोग गोपालन व संवर्धन मंडळ नावाने न्यास (ट्रस्ट) स्थापन करण्यात आला. 21 जानेवारी 2018पासून गोशाळेच्या कामकाजास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

ही गोशाळा सुरू करताना केवळ पाच गायी होत्या. या गायींच्या निवार्‍यासाठी दोन शेड्स उभारण्यात आले. त्या ठिकाणी गोपाळ कृष्ण मंदिर उभारण्यात आले. एक कार्यालय, प्रोसेसिंग सेंटर तसेच कामगारवर्गाच्या निवासासाठी एक सदनिका उभारण्यात आली. अवघ्या दोन वर्षांमध्ये या गोशाळेत  पाच गायींवरून 54 गोवंश झाले आहेत. त्यात 26 बछडे, 27 मोठ्या गायी व एक वळू आहे. सध्या या गोशाळेतून  ए-2 जातीच्या दुधाचे वितरण अलिबाग परिसरात सुरू करण्यात आले आहे. त्याला चांगली मागणी आहे. यातून गरजू लोकांची गरज पूर्णांशाने भागली जात नाही. तरीदेखील उपलब्धतेनुसार गरज भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे.  दुधाप्रमाणेच गोधनापासून निर्मित तूप, गो अर्क, गोमूत्र खतदेखील गोशाळेत तयार केले जाते. त्यालाही चांगली मागणी आहे.

भारतीय वंशाच्या म्हणजेच गीर, काकरेज, साहिवाल, सिंधी इत्यादी जातीच्या गायी ए-2 जातीचे दूध देतात. या दुधातील प्रथिने 

कॅन्सरविरोधी असतात. ही प्रथिने उच्च रक्तदाब, रक्ताभिसरण व रक्तातील शर्करा नियमित करण्यास मदत करतात. यांचे गोमूत्र गॅस, अिॅसडिटी, खोकला इत्यादी आजारांवर औषधी उपाय  म्हणून  वापरले जाते. सौंदर्यप्रसाधने, साबण, फिनाईल बनविण्यासाठी हे गोमूत्र उपयोगी आहे. याउलट जर्सी वगैरे गायी ए-1 जातीचे दूध देतात. ज्याच्या सेवनाने मधुमेह, हृदयरोग वाढल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही केवळ अधिक दूध देणार्‍या जर्सी गायींबरोबर आपण भारतीय गायींचे वेगाने संकरीकरण घडवत आहोत. यामुळे शुद्ध भारतीय वंशाची ए-2 जातीचे दूध देणारी गाय वेगाने कमी होत आहे.

ब्राझीलने हा धोका वेळीच ओळखून तेथील गोवंश ए-2 जातीचे दूध देणारा कसा राहील याचे नियोजन करून तेथील अर्थव्यवस्थाही भारतीय गोवंशावर आधारित त्यांनी उभी केली आहे.

भारतीय गायींचे आणि भारतीय गोवंशाचे महत्त्व काय आहे हे इतर देशांनी ओळखले आहे, परंतु भारतात मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारताच्या भावी पिढीसाठी भारतीय गोवंशाचे पालन व संवर्धन करणे गरजेचे आहे हे आळखून गिरीश तुळपुळे व त्यांचे सहकारी अलिबागसारख्या तालुक्यात गोशाळा चालवत आहेत. पाच गायी होत्या. आता 51 गोवंश आहेत. भविष्यात ते वाढणार आहेत. सध्या जी जागा आहे ती कमी पडणार आहे. जागेचा शोध सुरू आहे.  गायींची संख्या वाढल्यानंतर त्यांचा खर्चही

वाढेल. या गोशाळेतून सध्या मिळणार्‍या  उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त आहे. तो संस्थेला परवडतही नाही. कमळ नागरी सहकारी पतसंस्था यासाठी आर्थिक सहकार्य करीत असते. त्याचबरोबर काही दानशूर व्यक्ती यासाठी देणग्याही देतात. संस्थेतर्फे गोसेवा भविष्य निधी, गोदान, गोवंश संवर्धन, गोग्रास, गो मित्र अशा योजना राबविल्या जातात. गोदान योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. अलिबागसारख्या पर्यटनपूरक तालुक्यात जागा घेऊन ही मंडळी  कृषीपर्यटनासारखे प्रकल्प राबवू शकली असती, परंतु त्यांनी गोशाळा सुरू करून एक आदर्श घालून दिला. भारतीय वंशाच्या गोवंशाच्या संवर्धनासाठी चालवण्यात येत असलेली सहयोग गोशाळा एक स्तुत्य उपक्रम आहे. यातून प्रेरणा घेऊन रायगडात अशाच गोशाळा उभ्या राहू शकतील.

– प्रकाश सोनवडेकर

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply