Breaking News

कळंबोलीत आणखी सहा जवानांना लागण

पनवेल तालुक्यातील रुणांची संख्या 15वर

पनवेल : प्रतिनिधी
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ)च्या कळंबोली येथील कॅम्पमध्ये वास्तव्यास असलेल्या आणखी सहा जवानांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून, पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 15 झाली आहे.
सीआयएसएफच्या खारघर येथील 139 अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असणार्‍या 12 कर्मचार्‍यांपैकी पाच जवानांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून गुरुवारी उशिरा 146 अधिकारी-कर्मचार्‍यांना कळंबोली येथील महात्मा गांधी मेमोरियल (एमजीएम) हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश जारी केले होते. त्यांची तत्काळ कोविड-19 टेस्ट घेण्यात आली. त्यात सहा जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
प्रशासनाच्या निर्णयामुळे सीआयएसएफच्या जवानांना तत्काळ विलगीकरणात ठेवल्याने संभाव्य धोका कमी झाला आहे. एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आल्या असून, त्यांना आवश्यक असणार्‍या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी दिली.
‘त्यांच्या’ रिपोर्टची प्रतीक्षा
सीआयएसएफच्या कळंबोलीतील एकूण 11 जणांना कोरोनाची लागण झाली असताना आता दिल्लीतील मरकज कार्यक्रमातून पनवेलमध्ये परतलेल्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. हे आठ जण पनवेलच्या कोविड रुग्णालयात दाखल असून, त्यांचे रिपोर्ट मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply