Breaking News

लोधिवली ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार

चौकशीसाठी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

खालापूर : प्रतिनिधी 

तालुक्यातील लोधिवली ग्रामपंचायतीच्या विकासकामात भ्रष्टाचार झाला असून, त्याच्या पारदर्शक चौकशीसाठी ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत असल्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते एकनाथ सांगळे यांनी खालापूरच्या वरिष्ठ गटविकास अधिकार्‍यांना दिले आहे. चौक ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर लोधिवली ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या ग्रामपंचायत हद्दीत एलईडी दिवे, पेव्हर ब्लॉक अशी विकासकामे करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून ग्रामस्थ मारुती तवले, धनाजी भुईकोट व एकनाथ सांगळे यांनी 18 नोव्हेंबर 2019 रोजी विभागीय आयुक्त ते खालापूर गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. मात्र त्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. एकतीस लाख रुपयांच्या एलएडी दिवे खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाला असून, ग्रामपंचायत हद्दीतील विद्युत खांब व प्रत्येक घरी एलएडी दिवे दिले असते तरी एवढा खर्च झाला नसता, असे मारुती तवले यांनी सांगितले. घंटागाडी दुरुस्ती, ग्रामपंचायत कार्यालय, सदस्यांनी आपल्या घरासमोर व परिसरात पेवरब्लॉक बसविणे, कर्मचार्‍यांच्या नावे धनादेश काढणे, स्वतःची इमारत असताना ग्रामपंचायत कार्यालय भाड्याच्या ठिकाणी ठेवणे असे अनेक आरोप करण्यात आले आहेत.

लोधिवली ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची पारदर्शक चौकशी करावी, यासाठी 12 मार्चला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची नोटीस खालापूर गटविकास अधिकार्‍यांना दिली आहे.

-एकनाथ सांगळे, ग्रामस्थ, लोधिवली

चौकशीसाठी समिती नेमली आहे. चौकशीचा अहवाल अद्याप मिळाला नाही. चार वर्षाचा तपास आहे, त्यामुळे वेळ लागत आहे.

-संजय भोये, वरिष्ठ गट विकास अधिकारी, खालापूर पंचायत समिती

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply