Breaking News

महाविकास आघाडीच्या पहिल्याच अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांचा भ्रमनिरास; अपयश लपविण्याचा आघाडी सरकारचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 6) सदनात सादर केला. या अर्थसंकल्पात निरनिराळी आश्वासने देण्यात आली आहेत. नव्या सरकारच्या काळात राज्यातील आर्थिक परिस्थिती ढासळली असली तरी अर्थसंकल्पात मात्र निरनिराळ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. या अर्थसंकल्पात महिला, युवक, शेतकरी आदी कुठल्याही घटकाकरिता नव्या योजना नाहीत. मंदीची भीती दाखवून केवळ अपयश लपवण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना फडणवीस यांनी सांगितले की, अर्थमंत्री अजित पवार यांचे विधानसभेतील अर्थसंकल्पीय भाषण ऐकले. हे केवळ अर्थमंत्र्यांचे भाषण होते. यामध्ये कुठलीही आकडेवारी, आर्थिक स्थितीचे विश्लेषण नव्हते. नवीन वर्षात काय अपेक्षित आहे, किती तूट राहील किंवा अधिक राहील अशा कुठल्याही गोष्टी यात नाहीत. अर्थसंकल्पात संतुलन नाही. अर्थमंत्र्यांना व या सरकारला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा विसर पडला आहे. कोकणाचे नाव घेतले असले तरी कोकणाच्या तोंडालाही पाने पुसण्यात आली आहेत, असे फडणवीस यांनी निदर्शनास आणले.

फडणवीस पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या तोंडालाही पाने पुसण्यात आली आहेत. राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी मुदत कर्जासंबंधी कुठलीही नवीन घोषणा केली नाही. दोन लाखांच्या वर कर्ज असलेल्या शेतकर्‍यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. आम्ही दीड लाखाच्या वर कर्ज असलेल्या शेतकर्‍यांसाठी अशाच प्रकारची घोषणा केली. त्या वेळी आमच्यावर प्रचंड टीका करण्यात आली, पण आता हीच घोषणा नव्या सरकारने केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन हेक्टरी 25 हजार, 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. सरकारला सत्तेचे वचन लक्षात आहे, पण शेतकर्‍यांना ते विसरले, अशी टीका फडणवीस यांनी केली.

पायाभूत सुविधांवर आम्ही मोठ्या प्रमाणात खर्च केला, पण या सरकारने विशेष काही केले नाही. हे सरकार 10 लाख तरुणांना रोजगार देणार नाही, तर फक्त 11 महिन्यांचे अ‍ॅप्रेंट्रीस प्रशिक्षण देणार आहे. ते दिशाभूल करीत आहेत, असा आक्षेप फडणवीस यांनी नोंदविला आहे.

राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षातही सरकारने तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. बेरोजगार तरुणांसाठी हा फसवा अर्थसंकल्प आहे. सरकारमध्ये येण्यापूर्वी तिन्ही पक्षांनी जाहीर केलेला स्वतःचा शपथनामा आणि वचननाम्याचा त्यांना विसर पडला आहे. यातील एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे या सरकारला मी 10 पैकी एक गुण देईन.

-सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री

महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा व फसवा आहे. या अर्थसंकल्पातून सरकारने राज्यातील शेतकरी, आदिवासी, मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केवळ एक-दोन जिल्ह्यांसाठीच तयार केलेला हा अर्थसंकल्प आहे.

-प्रवीण दरेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply