पनवेल : वार्ताहर
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका दर्शन व पालखी परिक्रमा सोहळा प. पू. सद्गुरू नाना महाराज परांजपे यांच्या कृपार्शिवादाने श्री स्वामी समर्थ मंदिर (मठ) गावदेवी पाडा, पनवेल येथून सुरू करण्यात आला. संपूर्ण शहरात ही पालखी फिरविण्यात आली होती. यात पनवेलकरांनी सहभाग घेवून श्री स्वामी समर्थांचा गजर केला. पालखी शुक्रवारी सायंकाळी श्री स्वामी समर्थ मंदिर (मठ) येथून सुरू करण्यात आली. या पालखीत हजारो स्वामी सेवक सहभागी झाले होते. स्वामींच्या जयजयकाराचा गजर करीत यात किर्तन, त्याचप्रमाणे अभिनव स्वरगर्जना यांचे ढोल ताशा पथक यांनी पालखीत उत्साह अजून वाढविला. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत विविध सामाजिक मंडळांनी व राजकीय पक्षांनी केले. अनेक ठिकाणी पाणी, सरबत व फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर पालखी स्वामी समर्थ मठ येथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. या वेळी या पालखीत सहभागी झालेल्या विविध सामाजिक मंडळे तसेच महिला भजनी मंडळे यांना मठातर्फे मठाधिपती सुधाकर (भाऊ) घरत व अवधूत घरत यांनी तुळशीचे रोप शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले. पनवेलमधील हजारो भाविकांनी स्वामींच्या पादुकांचा दर्शनाचा लाभ घेतला. सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसची बोंबाबोंब असताना स्वामी सेवक कोणतीही तमा न बाळगता स्वामी आमच्या सोबत असताना आम्हाला असल्या व्हायरची काय भिती? स्वामींचा जयजयकार करीत ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.